मराठा असल्याने मंत्रीपद मिळाले नाही, मराठ्यांची फक्त मते हवीत, आमदार प्रकाश सोळंके यांचा सरकारला घरचा आहेर
गेल्या चाळीस वर्षांचा माझा अनुभव आहे. मराठा समाजाची मते घ्यायची पण बीड जिल्ह्याला मंत्रीपद देताना किंवा पालकमंत्री करताना पवारांना मराठा समाजाचा विसर पडतो. बीड जिल्हा हा ओबीसी आणि मागासवर्गीयांसाठी आरक्षित ठेवला आहे. मी पाच वेळा निवडून आलो आहे. अद्याप मला मंत्रीपद मिळाले नाही. कारण मला माझी जात आडवी येते, अशा शब्दात अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी खंत व्यक्त करत सत्ताधार्यांना घरचा आहेर दिला.
मंत्रिमंडळातून काही जणांना वगळण्यात येत आहे आणि पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर नियुक्ती करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकारला फटकारले आहे. ते म्हणाले, स्व.सुंदरराव सोळंके हे चाळीस वर्षापूर्वी बीड जिल्ह्यातून कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री झाले होते. त्यानंतर बीड जिल्ह्यातील मराठा समाजाला कधीच कॅबिनेट मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद मिळू शकले नाही. बीड जिल्हा तसा राष्ट्रवादीचा कणा राहिलेला आहे. प्रत्येकवेळी बीड जिल्ह्याने पवार कुटुंबाला मोठी ताकद देण्याचे काम केले आहे. मात्र ज्या पक्षाचा मराठा समाज हा कणा आहे. तो मराठा समाज बीड जिल्ह्यामध्ये उपेक्षित आणि वंचित राहिला आहे. धनंजय मुंडेंना मंत्रीपद दिले काय आणि अजून कोणती जबाबदारी दिली काय, माझ्या शुभेच्छा राहतील. मात्र बीड जिल्ह्यातील मराठा समाजाचा यावेळी विचार झाला पाहिजे. मी पाच वेळा निवडून आलो आहे. बीड जिल्ह्यात सर्वात वरिष्ठ विधानसभा सदस्य आहे. मात्र मला मंत्रीपद मिळण्यात माझी जात आडवी येत आहे. 45 वर्षाचा हा इतिहास राहिला आहे. मराठा समाजाला कॅबिनेट मंत्रीपदापासून दूर ठेवण्याचेच काम झाले आहे. बीड जिल्हा हा राष्ट्रवादीने ओबीसी आणि मागासवर्गीय घटकांसाठी कायम आरक्षित ठेवून मराठा समाजाला उपेक्षितच ठेवले आहे. मंत्रिमंडळाच्या फेरबदलाच्या वेळेस प्रत्येक वेळी माझे नाव चर्चेत असते. मंत्रीपद मात्र दिले जात नाही. मी मराठा असल्यामुळे मला डावलले जाते अशी खंत आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List