आरोग्य – वर्षा ऋतूतील ऋतुचर्या

आरोग्य – वर्षा ऋतूतील ऋतुचर्या

>> डॉ. आशुतोष कुलकर्णी

पावसाळा म्हणजेच वर्षा ऋतू आला की सर्दी, पडसे, अग्निमांद्य अशा आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. वातावरण बदलाप्रमाणे आपल्या आहारविहारात बदल केल्यास व पथ्य पाळल्यास प्रत्येक ऋतूचा आनंद घेता येतो. चांगले आरोग्य राखण्यासाठी ऋतूनुसार ऋतुचर्या हे ब्रीद कायम जपले पाहिजे.

पाणी शुंडी धरूनी गज ते मत्त झाले नभीचे
विद्युत्शोभा जणू पवनही दुंदूभी वाजवीतो
येतो हा ऋतू सहित मरूता शोभतो राजराजा
आला कामीजनप्रिय असा पावसाळा प्रिये हा
तृणामाथी हरित कवळी पालवी या तरुते
सारंगाच्या मुखक्षतभये अंकुरा जाग येते
तैसी शोभा मुखरित वनी रम्य विंध्याचलाच्या
द्रुमी पाते अभिनव मना वेधती हो जनांच्या
(ऋतुसंहार मराठी रूपांतर – अनुपमा कुळकर्णी)

ऋतुसंहारमधील हे वर्षा ऋतूचे इतके सुंदर वर्णन. नैऋत्य आणि पश्चिम दिशेकडून जोरदार वारे वाहू लागतात आणि आकाशात ढगांचे आच्छादन वाढू लागते. हळूहळू पर्जन्यवृष्टी सुरू होऊन संपूर्ण जग पाण्याने चिंब भिजवून जाते. झाडे हिरवीगार दिसू लागतात. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट अशा थाटात पाऊस प्रवेश करतो आणि सर्व पशुपक्ष्यांचा आनंद आसमंतात दिसू लागतो. सर्वत्र हिरवेगार गवत उगवायला लागते. या पावसाळ्यामध्ये शरीराची अवस्था ही आसमंताप्रमाणेच सर्व दोषांच्या उचंबळून येण्याने अस्थिर होते. रूक्षता आणि शीतलता वाढल्यामुळे वातदोष संचय सुरू झालेला असतो. पावसाच्या सतत पडल्याने हवेत सर्वत्र आर्द्रता वाढलेली असते. त्या प्रमाणात गारठाही असतो. अशा वेळी शरीरामध्ये अनेक घडामोडी होत असतात, ज्यामध्ये महत्त्वाची घडामोडी म्हणजे अग्निमांद्य आणि थकवा अधिक जाणवू लागतो.

वर्षा ऋतूमध्ये पिकणारा भाजीपाला अगदी नवीन असल्यामुळे त्यात आम्लरस जास्त असतो आणि तोसुद्धा वातप्रकोपास कारणीभूत ठरू शकतो. सतत कोसळणाऱया पावसामुळे गढूळ झालेले पाणी हेही अनेक विकारांचे कारण होऊ शकते. त्यामुळे अशा ऋतूमध्ये त्याचा आनंद घेत असतानाच आपण आहारविहार योग्य ठेवला तर नक्कीच अनेक रोग होण्यापासून आपली सुटका होऊ शकते. म्हणून आयुर्वेदात वर्षा ऋतूचीच नाही, तर सर्व ऋतूंची ऋतुचर्या दिली आहे. ज्यामुळे रोग होऊ नये अशा प्रकारे व्यवस्था करण्यात येऊ शकते.

देहदौर्बल्य, अग्निमांद्य, वातप्रकोप, पित्ताचा संचय अवस्था या दृष्टिकोनातून आयुर्वेदाने अनेक अन्नपदार्थांची योजना या ऋतूमध्ये केलेली आहे.

या ऋतूमध्ये आहार काय घ्यावा हा मोठा प्रश्न असतो. या काळात पिष्टमय पदार्थ नको. जास्ती प्रथिने घ्यावी असा दृढ समज वाढत आहे. त्यामुळे अनेकदा एककल्ली आहार केल्यामुळे शरीरावर दुष्परिणामच दिसू लागले आहेत. अतिरेक न करता योग्य आहार करणे आणि आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आहारपद्धतीत बदल करा
नवीन धान्य हे पचण्यास जड असते आणि शरीरामध्ये क्लेद निर्माण करून अग्निमांद्य वाढवणारे असते. नाईलाजाने जर नवीन धान्य वापरावे लागले तर ते भाजून वापरावे असा संकेत आहे. भाजताना होणाऱया अग्निसंस्कारामुळे धान्यातील अभिष्यंदी गुण कमी होऊन ते पचण्यास थोडे हलके होते.

साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या हे पदार्थ हलके असल्यामुळे ते वापरण्यास हरकत नाही. त्याचबरोबर भाकरी, मुगाचे वरण, मुगाची खिचडी, वरण, हुलग्याचे पिठले इत्यादी पदार्थ आहारात ठेवावे.

बेकरी पदार्थ खाणे वर्ज्य करावे. ब्रेड हा आंबवून तयार केलेला पदार्थ असल्यामुळे अभिष्यंदी गुणाचा आहे. या ब्रेडऐवजी तो भाजून त्याचा टोस्ट केला तर ते थोडे फायद्याचे ठरू शकते.

दही हे अभिषंदी, अग्निमांद्यकर असल्यामुळे दही या ऋतूमध्ये अगदी निषिद्ध आहे, परंतु त्याच्यावर घुसळण्यासारखा अग्निसंस्कार केल्यामुळे जे ताक उत्पन्न होते ते अग्निवर्धनासाठी उत्तम आहे.

जेवणामध्ये जड पदार्थ टाळावे. उदाहरण श्रीखंड इत्यादी. स्वयंपाकामध्ये जास्त करून सुंठ, मिरे, हिंग, पिंपळी, जिरे, आले, लिंबू, कोथिंबीर, लसूण इत्यादी दीपन पाचन करणारी द्रव्ये अधिक प्रमाणात वापरावीत.

मसाल्याचे पदार्थ रुची वाढवणारे असल्यामुळे त्या पदार्थांचाही वापर करावा.

दुधी, भोपळ्याचे भरीत, दोडका, पडवळसारख्या वेलवर्गीय भाज्या, भेंडी यासारख्या भाज्यांचा उपयोग अधिक प्रमाणात कराल तर अग्निमांद्य होण्यास अटकाव होऊ शकतो.

पालेभाज्या मात्र या ऋतूत खाऊ नयेत.
मूग, मसूर, मटकी, तूर यासारख्या छोटय़ा कडधान्यांचा वापर करावा. वाटाणा, हरभरा, चवळी, वाल शक्यतो टाळावे.

जेवणामध्ये अत्यंत महत्त्वाचे तूप आहे. तूप वातशामक असल्यामुळे तसेच उत्तम अग्निवर्धक असल्यामुळे त्याचा वापर करणे फायद्याचे ठरते.

पावसाळ्यात भजी, वडे खाण्याची खूप इच्छा होते व त्यामुळे नंतर त्रास भोगावे लागतात. शक्यतो या गोष्टी टाळा. जरी तूप तेलासारखे स्निग्ध पदार्थ वापरण्यास सांगितले असले तरी तळलेले पदार्थ कटाक्षाने टाळावेत. तळलेले पदार्थ हे जळजळ उत्पन्न करणारे, पचण्यास जड असल्यामुळे असे पदार्थ वर्ज करावेत. इडली, डोसा यांसारखे पदार्थ आंबवलेले असल्यामुळे ते या ऋतूत निषिद्ध आहेत.

रवा भाजून केलेला उपमा, मुगाचे घावन, पोहे हे या दिवसांमध्ये सकाळची न्याहारी करण्यासाठी वापरावे. थोडक्यात आहार हा वातदोष कमी करण्यासाठी पचण्यास हलका व योग्य प्रमाणात घ्यावा.

वर्षा ऋतूमध्ये दिवसभर पाऊस जर कोसळत असेल तर मानसिकरीत्या निरुत्साही मन बनलेले असते. अशा दिवसांना दुर्दिन म्हणून म्हटले जाते. अशा दुर्दिन प्रसंगी कुठल्याही पंचकर्मातील क्रिया अथवा महत्त्वाची कामे करण्यास वर्ज्य करावे असे सांगितले आहे.

या ऋतूमध्ये पंचकर्मातील अत्यंत उपयुक्त बस्ती कर्म करावयास सांगितले आहे. बस्ती हा शोधन चिकित्सेतला एक उपक्रम असून ही वातदोषावरती चिकित्सा आहे.

योग्य सवयींचा अवलंब करा

  • पाणी अत्यंत अशुद्ध ढवळून निघालेले असल्यामुळे पाणी निवळून, तुरटी फिरवून, गाळून आणि उकळूनच प्यावे किंवा अनेक आधुनिक पद्धतीचे फिल्टर यासारख्याचा वापर करून पाणी शुद्ध करून पिण्यास हरकत नाही. साथीचे रोग टाळण्यासाठी या गोष्टी पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
  • आंघोळीसाठी व पिण्यासाठी गरम पाण्याचा उपयोग करावा. कुठल्याही ऋतूमध्ये मद्यपान टाळावे. अगदी घ्यावयाचे असल्यास द्राक्षापासून बनवलेले आणि जुने मद्य घ्यावे. अतिथंड घेऊ नये आणि प्रमाणात पाणी मिसळून अल्पमात्रेत घ्यावे.
  • वर्षात ऋतूमध्ये अतिव्यायाम आणि साहस हे टाळावे. आता सध्या धबधबे, डोंगराकडे जाण्याचे फॅड निघालेले आहे आणि त्यामुळे लोक जीव गमावताना दिसतात. आयुर्वेदामध्ये हजारो वर्षांपूर्वी हेच सांगितलं आहे की, या दिवसांमध्ये अतिव्यायाम, साहस टाळावे.
  • या ऋतूमध्ये दिवसा झोपल्यास अग्निमाद्य आणि कफाचा उद्रेक होऊ शकतो. रात्रीच जागरण करणे टाळावे. पावसात शक्यतो बाहेर पडू नये. बाहेर जायचे असल्यास पूर्ण खबरदारी घेऊन बाहेर पडावे. छत्री किंवा रेनकोट घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नये. पायी हिंडणे शक्यतो टाळावे.
  • अंगावर ओले कपडे वापरणे शक्यतो टाळावे. स्वच्छ कपडे, दमटपणा व कुबटपणा घालविण्यासाठी चांगली इस्त्राr केलेले असल्यास त्वचेचे आरोग्य चांगले राहते.

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ लोकांसाठी ऊसाचा रस म्हणजे विषच, पिण्याआधी दहावेळा विचार करा ‘या’ लोकांसाठी ऊसाचा रस म्हणजे विषच, पिण्याआधी दहावेळा विचार करा
उसाचा रस हा आपल्या आरोग्यासाठी किती चांगला असतो. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. उन्हाळ्यात तर आवर्जून लोकं कोल्ड्रींक्सपेक्षा उसाच्या रसाला...
आधी मसाला स्प्रे मारला मग चाकूने केले वार, त्यानंतर…; पतीकडून अभिनेत्रीला जीवेमारण्याचा प्रयत्न
बिहारमधील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ; आढळून आले नेपाळ, म्यानमाग, बांगलादेशचे नागरिक
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा, मोठा पडदा गाजवणारे दिग्गज खलनायक कोटा श्रीनिवास राव यांचं निधन
मिंधे गटाच्या ‘त्या’ पाच मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर न्यायालयीन चौकशी लावा, संजय राऊत यांची फडणवीसांकडे मागणी
मराठी बोलणार नाही, मला मारून टाकलं तरी चालेल! प्रसिद्ध अभिनेत्याची मुजोरी
लॉर्ड्सवर शेवटच्या षटकात हायव्हॉल्टेज ड्रामा; शुभमन गिलचा रुद्रावतार, सिराजमधला DSP जागा झाला; नेमकं काय घडलं?