रंगभूमी- चिंतन नियतीवादाचे
>> अभिराम भडकमकर
नाटक घडवताना आपल्या बाजूपेक्षा वेगळी भूमिका घेणारे पात्र, घेणारी व्यक्तिरेखा मूर्खपणाकडे झुकलेली बाळबोध उभी केली की समोरच्या भूमिकेचं काम सोपं… पण आयुष्य कुठे इतकं सोपं आहे? नियती अनपेक्षितपणे समोर वेगळंच काहीतरी उभं करते. नियतीचा हा खेळ पाहता आयुष्याच्या प्रयोगाला निष्कर्षाची घाई करू नये हे त्याच ओघाने जाणवते.
वैचारिक नाटक असा आपण एक सहज शब्द वापरून जातो. यामध्ये दोन अथवा काही विचारांचे द्वंद्व असणे अपेक्षित असते. अनेकदा लेखक एखादा विचार रेटण्यासाठी किंवा मांडण्यासाठी वैचारिक नाटक लिहितो. खरे तर याही बाबतीत खूप वादविवाद आहेत. म्हणजे लेखकांनी एक बाजू घेऊन तो विचार मांडण्यासाठी लिहावे का? की तटस्थपणे सर्व बाजू मांडून लोकांवरती ते सोडून द्यावे? अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
मला नेहमी असं वाटतं की, लेखकांनी विचारनाटय़ असेल तर दोन्ही बाजू किंवा सर्व बाजू तितक्याच खणखणीतपणे मांडाव्यात. एक मुळातच दुबळी आणि दुसरी अतिशय प्रभावी हे विचारनाटय़ामध्ये अपेक्षित नाही, पण अनेकदा आपल्याकडे असंच होतं. एक भूमिका मांडत असताना इतरांवर लेखक अन्याय करतो.
मात्र काहींचे ठाम मत असते की, नाटकाचे मुळात प्रयोजन हे वैचारिक मंथन नसून आपला विचार मांडायचे ते साधन आहे. विचाराचा माऊथपीस! चळवळी नाटकाचा असा उपयोग करून घेतात. मात्र बहुतांश नाटय़कर्मी नाटक हे मनुष्य नावाचं कोडं सोडवण्याचा प्रयत्न करणारे माध्यम म्हणून त्याकडे बघतात. जग आणि जगणं समजून घेण्याचा मार्ग म्हणून त्याकडे बघतात.
‘ज्याचा त्याचा प्रश्न’ हे नाटक आस्तिक-नास्तिक प्रश्नावरती आहे असं एक ढोबळ विधान केलं जातं. त्यामध्ये परमेश्वराकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन बाळगणाऱया व्यक्तिरेखा आहेत. मी ते मांडत असताना सर्वच दृष्टिकोन तितक्याच ताकदीने मांडायचा प्रयत्न केला. म्हणजे केवळ विज्ञानवादी मनुष्य हा अतिशय बुद्धिमान, संवेदनशील आणि बाकी अज्ञानी असं न दाखवता सर्व पात्रांची स्वतची अशी त्यांच्या अनुभवातून निर्माण झालेली मतं, त्या त्या पात्राचं वय, शिक्षण आणि एकूणच मानसिकता डोळ्यांसमोर ठेवून मी मांडली. त्यामध्ये नियतीच्या न्यायामुळे संभ्रमित झालेला लहानगा मनू हे पात्र विज्ञानवादी पित्याला काही प्रश्न करते. तो म्हणतो, उत्तरपत्रिकांचा गठ्ठा हरवला म्हणून अंदाजपंचे मार्क दिले गेले आणि त्यामुळे मुलांवर अन्याय झाला. हे या व्यवस्थेचे दुबळेपण हे मी समजू शकतो, परंतु नेमकी ‘माझीच’ उत्तरपत्रिका गहाळ का झाली? नेमका मीच का? नाही होत एखाद्या बाईला मूल, पण बाई, ती बाई तुम्हीच का? तो असा जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा या विचारनाटय़ात नाटय़ाला दुसऱयाही बाजूचं एक म्हणणं आहे हे जाणवतं आणि प्रेक्षक पुन्हा बुचकळ्यात पडतो.
मी ज्या वयात ते नाटक लिहिलं, त्या वयात नास्तिकवादाचं आकर्षण असतानाही मला नियतीच्या खेळाबद्दल असं काही लिहावसं वाटलं याचं मला आश्चर्य वाटतं आणि समाधानही. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे कालचीच घटना. अभय कुलकर्णी या अनेक मालिका व चित्रपटांत उत्तम अभिनय करणाऱया अभिनेत्या मित्राबरोबर चांगल्या दोन-अडीच तास गप्पा मारून, एका कार्यक्रमाची तालीम करून मी घरी परतत होतो आणि अचानक फोन आला, अभयला दुचाकीने धडक दिली. पायाला जबर दुखापत झाली आहे आणि तो दवाखान्यात आहे. आम्ही दवाखान्यात धावलो तेव्हा एकच विचार मनात होता. एका क्षणात काही वेगळंच घडून गेलं की! उद्या भेटायचंय, तालीम करायची आहे, कार्यक्रमाचे नियोजन करायचंय हे सगळं ठरवून बाहेर पडल्यानंतर आम्हाला माहीतच नव्हतं की कोपऱयामध्ये ती नियती उभी आहे आणि तिने काहीतरी वेगळेच योजून ठेवलेले आहे. अशा घटना घडल्या की, वाटू लागतं दुसऱया क्षणाचा भरवसा नाही. अगदी आयुष्य क्षणभंगूर इथवर विचारचक्र पळू लागते. दुचाकीने धडक दिली ती अभयलाच का? या प्रश्नाचे उत्तर काय? मग नियती नावाचं काही असतं का? असे विचार मनात घोळू लागतात आणि मग आपल्या नाटकामध्ये नियतीच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारी माणसंही खरी वाटू लागतात.
हे चिरंतन प्रश्न आहेत. मनुष्यजातीला कायमच छळणारे. त्यांची ठरावीक अंतिम उत्तरे नसतात. एकच बाजू घेऊन किल्ला लढवणं सोपं असतं नाटकात, तर आपल्या बाजूपेक्षा वेगळी भूमिका घेणारे पात्र, घेणारी व्यक्तिरेखा मूर्खपणाकडे झुकलेली बाळबोध उभी केली की काम सोपं होतं. पण आयुष्य कुठे इतकं सोपं आहे? मग वाटतं आपण किती घाई करतो ना भूमिका घेण्याची आणि मग घेतलेली भूमिका कशी खरी आहे, योग्यच हे सिद्ध करण्याचा आटापिटा करण्याची. हेमिंग्वे म्हणतो, लेखकांनी निवाडा करायचा नसतो. त्यानं समजून घ्यायचं असतं. म्हणजे प्रत्येक व्यक्तिरेखा आणि तिची भूमिका समजून घेणं व आपल्या नाटकातून त्या पद्धतीने ते मांडणं हे लेखकाचं काम असतं.
जुलैच्या शेवटी कार्यक्रम करण्याच्या तयारीत असलेला हा अभिनेता आता शस्त्रक्रिया, मग आराम, मग पुन्हा सगळं काही सुरू होण्याची वाट पाहत दवाखान्यात पहुडला आहे. मीच का असा प्रश्न नियतीला करत! लेखक म्हणून अशा वेळी मला प्रत्येक बाजू समजून घेऊन तिचं दर्शन घडवणं हे किती महत्त्वाचं असतं हे पटू लागतं आणि जेष्ठ कादंबरीकार संजय गोळे म्हणतात तसं ‘आयुष्याच्या प्रयोगाला निष्कर्षाची घाई नको’ हे खरं वाटू लागतं.
तात्पर्य काय तर नियतीवादाबद्दल सखोल चिंतन मांडणारे जीए कुलकर्णी आता पुन्हा काढून वाचावे लागणार. तसंही जीए वाचल्यापासून ते मानगुटीवर बसून राहणार ही मराठी साहित्याचा अभ्यास आणि आवड असलेल्यांची नियती आहेच की.
(लेखक नाटय़कर्मी असून नाटय़क्षेत्राचे अभ्यासक आहेत)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List