डोळ्यांमध्ये ‘ही’ लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांना भेटा आणि गंभीर आजारांचा धोका टाळा
आपल्या जीवनात डोळे किती महत्त्वाचे आहेत, हे वेगळे सांगायला नको. पण डोळ्यांची योग्य काळजी घेण्यासाठी त्यांची वेळोवेळी तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा डोळ्यांमध्ये त्रास सुरू होतो, पण आपल्याला त्याची कल्पनाही येत नाही आणि हळूहळू समस्या वाढत जाते. यामुळे काही लोकांना जेव्हा डोळ्यांच्या आजारांबद्दल कळतं, तोपर्यंत त्यांची दृष्टी खूप कमी झालेली असते किंवा पूर्णपणे गेलेली असते. मोतिबिंदू, काचबिंदू (ग्लुकोमा), रेटिनल आजार किंवा डोळ्यांच्या संसर्गासारखे अनेक आजार एकदा झाले की दृष्टी कमजोर होते आणि नंतर उपचारांनीही ती पूर्णपणे बरी करता येत नाही. म्हणूनच डोळ्यांची नियमित तपासणी करणे खूप महत्त्वाचे आहे.
किती महिन्यांनी डोळ्यांची तपासणी करावी?
डाॅक्टरांच्या माहितीनुसार, डोळ्यांची तपासणी खालीलप्रमाणे करावी:
लहान मुले:
पहिल्यांदा डोळ्यांची तपासणी मुलांनी वयाच्या 6 व्या महिन्यात करून घ्यावी.
यानंतर, मूल 3 वर्षांचे झाल्यावर पुन्हा एकदा तपासणी करणे आवश्यक आहे.
6 वर्षांनंतर, मुलांनी दरवर्षी डोळ्यांची तपासणी करावी. मुलांमधील दृष्टीदोषाचे लवकर निदान झाल्यास त्यावर प्रभावी उपचार करता येतात आणि त्यांच्या विकासावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही.
18 ते 40 वर्षांचे तरुण:
या वयोगटातील तरुणांनी वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी करावी.
जरी तुम्हाला डोळ्यात कोणतीही विशेष समस्या जाणवत नसली तरी, डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी ही नियमित तपासणी महत्त्वाची आहे.
मात्र, जर तुम्हाला अचानक अस्पष्ट दिसणे, सतत डोकेदुखी किंवा डोळ्यात दुखणे जाणवले, तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
40 वर्षांवरील व्यक्ती:
40 वर्षांनंतर डोळ्यांची तपासणी वर्षातून एकदा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या वयात मोतिबिंदू (Cataract) आणि काचबिंदू (Glaucoma) यांसारख्या डोळ्यांच्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
याशिवाय, वयानुसार मॅक्युलर डीजनरेशन (AMD) सारख्या रेटिनल समस्यांचा धोकाही वाढतो. नियमित तपासणीमुळे या समस्यांचे वेळेत निदान होऊन उपचार करणे शक्य होते.
जर तुम्हाला आधीच डोळ्यांचा कोणताही आजार असेल किंवा तुमच्या कुटुंबात कोणाला डोळ्यांचे अनुवंशिक आजार असतील, तर दर 3 ते 6 महिन्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करावी.
ही लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांना भेटा:
डोळ्यांमध्ये कोणतेही असामान्य लक्षण दिसल्यास त्वरित तपासणी करावी. अस्पष्ट दिसणे किंवा दृष्टी कमी होणे, डोळ्यात दुखणे किंवा जळजळ होणे, अचानक दृष्टीमध्ये बदल होणे, डोळ्यांच्या आसपास किंवा आत लालसरपणा येणे आणि सतत डोकेदुखी अशी लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांना भेटावे आणि डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. डोळ्यांची नियमित तपासणी केवळ दृष्टीसंबंधीच्या समस्या वेळेत ओळखण्यास मदत करत नाही, तर इतर आरोग्य समस्यांची (उदा. मधुमेह, उच्च रक्तदाब) चिन्हे ओळखण्यातही उपयुक्त ठरते. डोळ्यांच्या समस्यांवर जितक्या लवकर उपचार केले जातात, तितके ते प्रभावी ठरतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List