विद्यार्थ्यांना ताट धुण्यास लावले; पनवेलमध्ये मुख्याध्यापिका निलंबित, शिक्षण अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
लहान विद्यार्थ्यांना जेवणाचे ताट आणि डबे धुण्यास लावल्याचा संतापजनक प्रकार पनवेल शहरातील श्रीगणेश विद्या मंदिर शाळा क्रमांक 6 मध्ये घडला आहे. याची गंभीर दखल घेऊन पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेला तत्काळ निलंबित केले आहे. महापालि का शाळेत हा प्रकार घडल्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आल्याने शिक्षण विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची पळापळ उडाली आहे.
पनवेल महापालिका अंतर्गत असलेल्या या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जेवणाचे ताट आणि डबे धुण्यासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. या कामाचा ठेका प्रशासनाने अक्षयपात्र या संस्थेला दिला आहे. मात्र महापालिकेच्या श्रीगणेश विद्या मंदिर शाळा क्रमांक 6 मध्ये जेवणाचे ताट व डबे विद्यार्थ्यांकडून धुऊन घेतले जात होत होते. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन हिलम यांना तत्काळ निलंबित केले, तर पनवेल महापालिकेचे शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली. विद्यार्थ्यांचे जेवण झाल्यानंतर त्यांचे ताट आणि डबे धुण्यासाठी या शाळेत काही आया ठेवण्यात आल्या आहेत. या आयांची तातडीने बदली करण्यात यावी अशा सूचनाही आयुक्तांनी अक्षयपात्र संस्थेला दिल्या आहेत.
हलगर्जीपणा खपवून घेणार नाही
घडलेला प्रकार हा गंभीर असून तो मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे घडला आहे. यापुढे असा हलगर्जीपणा कोणत्याही शाळेत खपवून घेतला जाणार नाही. लहान मुलांबाबत सर्वच शाळांतील शिक्षक आणि अन्य यंत्रणांनी जागरूक राहावे. जर असा प्रकार पुन्हा घडला तर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List