टीएमटीच्या 33 जुन्या बसेस भंगारात काढणार, लिलावातून प्रशासनाला 1 कोटीची कमाई
परिवहन सेवेतील जुन्या झालेल्या ३३ बसेस भंगारात काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 15 वर्षे जुन्या झालेल्या आणि मुदत संपलेल्या डिझेल आणि सीएनजीच्या एकूण 33 बसेसचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावातून प्रशासनाला जवळपास 1 कोटींची कमाई होणार आहे. बसच्या विक्रीकरिता शासकीय परवानगी मिळणे आवश्यक आहे. ती मिळताच ऑगस्ट महिन्यात भंगार बसेसची ऑनलाइन पद्धतीने लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.
ठाणे परिवहन सेवेत सध्याच्या घडीला सुमारे 435 बसेस आहेत. त्यामध्ये 123 इलेक्ट्रिक बसेसचा समावेश आहे. तसेच डिझेल आणि सीएनजीवर चालणाऱ्या बसदेखील प्रशासनाकडे आहेत. यातील एकूण 33 बस पंधरा वर्षे जुन्या झाल्या असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. या बसेस आगारात पडून असल्याने डेपो हाऊसफुल्ल झाले आहेत. दरम्यान, या भंगारजमा 33 बसेस ऑनलाइन पद्धतीने लिलाव करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बसेसची लिलावात विक्री झाल्यास परिवहनच्या तिजोरीत लक्ष्मीदर्शन होणार आहे.
उत्पन्नवाढीसाठी महत्त्वाचे पाऊल
अनेक कारणाने परिवहन सेवेला ग्रासले आहे. नादुरुस्त बसेस, त्यांची योग्य रीतीने न केलेली दुरुस्ती, कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा आणि प्रशासनाचा नसलेला अंकुश या आणि इतर कारणाने ही परिवहन सेवा नेहमीच वादात राहिली आहे. याआधी परिवहन सेवेवर टीकाच जास्त झाली. त्यामुळे आता उत्पन्नवाढीवर परिवहन सेवेने काही महत्त्वाचे पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून भंगार झालेल्या बसेस लिलावात काढण्यात येणार आहेत.
तब्बल 153 बसेस यापूर्वी ज्या कळवा आणि वागळे आगारात पडून होत्या त्या नादुरुस्त भंगारातील बसच्या लिलावाची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आदी शहरातील व्यापाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी 5 कोटी 82 लाख रुपये पालिकेच्या परिवहन विभागाला मिळाले होते.
“ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात सद्यस्थितीत एकूण 435 बसेस आहेत. लवकरच आम्ही जुन्या 33 बसेसच्या विक्रीची ऑनलाइन पद्धतीने लिलाव प्रक्रिया राबवणार आहोत. त्याकरिता आवश्यक त्या विविध शासकीय परवानगी आम्हाला काही दिवसात मिळणार आहे. त्यानंतर लिलावाची प्रक्रिया पार पडणार आहे.”
भालचंद्र बेहेरे, ठाणे परिवहन व्यवस्थापक
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List