चांद्यापासून बांद्यापर्यंत भाजप हा गुन्हेगारांचा पक्ष बनला आहे, संजय राऊत यांची जोरदार टीका
चंद्रपूरमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकी आधी भाजपने ज्यांच्यावर आर्थिक गुन्ह्यांचे आरोप केले अशा संचालकांनी निवडून आल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी मुंबईत विधानभवननात या संचालकांचा भाजप प्रवेश झाला. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ”चांद्यापासून बांद्यापर्यंत भाजप हा गुन्हेगारांचा पक्ष बनला आहे. हा निर्लज्जपणाचा कळस आहे या सरकारचा, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला फटकारले.
”परवा चंद्रपूरला जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक झाली. भाजपकडे अध्यक्षपद निवडून आणण्यासाठी बहुमत नव्हतं. चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, किशोर जोरगेवार यांनी इतर पक्षातील निवडून आलेल्या संचालकांवर दबाव आणण्यासाठी बँक भरतीचं जुनं प्रकरण उकरून काढलं, SIT लावण्याची धमकी दिली. आणि त्या सगळ्यांना भाजपात सामिल करून घेतलं. त्या सगळ्यांवर कालपर्यंत भाजपने आरोप केले होते. आता त्याच गुन्हेगारांना भाजपात सामिल करून घेतलं व बँक ताब्यात घेतली. हा विषय आम्ही तडीस नेऊ व भाजपला आम्ही धडा शिकवू. गुन्हेगारांना पक्षात घेणं ही काय चाणक्य निती आहे का? आम्ही त्यांना गुन्हेगार म्हटलं नव्हतं. तुम्ही त्यांना गुन्हेगार म्हटलं होतं. अशा आर्थिक गुन्हेगारांना तुम्ही मुख्यमंत्री म्हणून विधानभवनात विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना त्यांचं पक्षात स्वागत करत आहात. लाज वाटली पाहिजे. निर्लज्जपणाचा कळस आहे या सरकारचा, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
” भाजपने त्या संचालकांना पक्षात घेतलं व फडणवीसांनी त्यांचं स्वागत केलं. एका बाजुला म्हणायचं की भ्रष्टाचारांना माफ करणार नाही आणि दुसरीकडे भ्रष्टाचाऱ्यांचं पक्षात स्वागत करायचं. देवेंद्र फडणवीस हे दुतोंडी साप आहेत का? चांद्यापासून बांद्यापर्यंत भाजप हा गुन्हेगारांचा पक्ष बनला आहे. भाजपने एक गुन्हेगारांच्या भरतीची जाहीरात दिली पाहिजे. गुन्हेगार, खूनी, बलात्कारी यांच्या भरती आहे अशा आशयाची ती जाहीरात हवी. त्यासाठी टेंडर काढावं.
”अशा प्रकारे जर राज्यात कायदा व सुव्यवस्थेची अवस्था असेल तर पुण्यासारख्या ठिकाणी क्राईम रेट वाढळा तर आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. कायद्याची भिती राहिलेली नाही, पोलिसांचं राजकीय बुजगावनं झालं आहे. आपआपल्या जिल्ह्यात मंत्री आपल्याला हवे ते पोलीस अधिकारी नेमत आहेत. पोलीस ज्यांच्याकडे गुन्हेगार म्हणून पाहत होते त्यांना भाजप पक्षात घेऊन प्रतिष्ठा देते. ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. ते आपला बचाव करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. पुण्यातला प्रकार तोच आहे. नाशिकचे पोलीस आयुक्तच आपल्या टेबलावर भाजपचा झेंडा लावून बसले आहेत. ते असं का करतायत ते रहस्य आहेत. हा कोणता ट्रॅप आहे ते मला पाहावं लागेल. आधी गुन्हे दाखल करायला लावायचे आणि मग पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावून निर्णय घ्यायला सांगायचे. अशा प्रकारे भाजपमध्ये गुन्हेगारांची भरती होणार असेल तर तुम्ही काय अपेक्षा करता, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List