शुगर फ्री खीर, ग्रील्ड चिकन, नाचणी बाजरी इडली… संसदेच्या कॅन्टीनमध्ये आता खासदारांना मिळणार पौष्टीक पदार्थ
संसदेतील खासदारांना पौष्टीक अन्न मिळावे या हेतूने खासदार आणि अधिकाऱ्यांना पौष्टिक अन्नपदार्थ देण्याची आता तयारी केली जात आहे. खासदारांची तणावपूर्ण जीवनशैली लक्षात घेऊन, संसदेतील कॅन्टीनमध्ये आता पौष्टीक पदार्थ आणण्याची योजना आखण्यात येत आहे. नवीन मेनूमध्ये खासदारांच्या आरोग्याचा विचार करून नाचणी बाजरी इडली, ज्वारी उपमा, ते मूग डाळ चिल्ला आणि भाज्यांपासून ते ग्रील्ड फिशपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विनंतीवरून हा नवीन मेन्यू तयार करण्यात आलेला आहे. मेन्यू खासदारांच्या आरोग्याचा विचार करून त्यांना योग्य पोषण मिळावे याच हेतूने करण्याचे योजिले आहे. निरोगी आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी बिर्ला यांनी या मेनूमध्ये बाजरीवर आधारीत पदार्थ ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये फायबरने समृद्ध सॅलड आणि प्रथिनांनी समृद्ध सूपसह स्वादिष्ट करी आणि विविध थाळींचा समावेश करण्यात येत आहे.
संसदेच्या या नवीन मेनूमध्ये समाविष्ट असलेल्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स, सोडियम आणि कॅलरीज यांची मात्रा कमी असणार आहे. तसेच हे पदार्थ आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध राहावे म्हणून काळजीपूर्वक तयार केले गेले आहेत. मुख्य बाब म्हणजे, प्रत्येक पदार्थांच्या नावापुढे कॅलरीजची संख्या देखील दिली आहे.
मुख्य आकर्षणांमध्ये ‘रागी बाजरी इडली’ ‘सांभार आणि चटणी’ (270 किलो कॅलरीज), ‘ज्वारी उपमा’ (206 किलो कॅलरीज) आणि साखर नसलेली ‘मिक्स बाजरी खीर’ (161 किलो कॅलरीज) यांचा समावेश आहे. ‘चना चाट’ आणि ‘मूग दाल चिल्ला’ सारख्या लोकप्रिय हिंदुस्थानी पदार्थांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. हलक्या नाश्त्यासाठी ‘बार्ली’ आणि ‘ज्वारी सॅलड’ (294 किलो कॅलरी) किंवा ‘गार्डन फ्रेश सॅलड’ (113 किलोकॅलरी) सोबत ‘रोस्ट टोमॅटो’ आणि ‘तुळशी शोरबा’ आणि ‘व्हेजिटेबल क्लियर सूप’ अशा विविध सॅलडचा आस्वाद घेता येणार आहे.
मांसाहारी जेवण आवडणाऱ्यांसाठी, ‘उकडलेल्या भाज्यांसह ग्रिल्ड चिकन’ (157 किलोकॅलरी) आणि ‘ग्रिल्ड फिश’ (378 किलोकॅलरी) सारखे पर्याय उपलब्ध आहेत. मेनूमध्ये पेयांसाठीही अनेक पर्याय आहेत. यात हर्बल चहा, गुळाच्या चवीचे कैरीचे पन्हे, साखरेचा सोडा इत्यादी पौष्टिक पेयांचा समावेश आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List