माझ्या राज्यात मी बंगालीतच बोलणार, ममतांचा नारा
भाजपशासित राज्यांमध्ये बंगाली भाषिकांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे. तेथील बंगालींसोबत भेदभाव केला जात आहे, असा आरोप करतानाच मला अटक करून डिटेन्शन सेंटरमध्ये टाका, परंतु माझ्या राज्यात मी बंगालीच बोलणार, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला ठणकावले. भाजपच्या भाषिक जुलूमशाहीविरोधात आज कोलकात्यात विराट मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
पंतप्रधान मोदी गुरुवारी बंगालच्या दौऱयावर येत आहेत, त्याच्या आदल्या दिवशीच तृणमूलच्या वतीने आंदोलनाद्वारे मोदींना इशारा देण्यात आला. त्यामुळे वातावरण तापले आहे.
बंगालमधील तब्बल 22 लाख मजूर आणि कामगार देशाच्या विविध भागांत काम करत आहेत. त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व असल्याचा वैध पुरावा आहे, तरीही त्यांच्यावर विशेषतः भाजपचं सरकार असलेल्या राज्यात सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे, असा आरोप ममतांनी केला.
भाजपच्या भाषिक जुलूमशाहीविरोधात कोलकात्यात एल्गार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी भाजपच्या भाषिक जुलूमशाहीविरोधात एल्गार पुकारण्यात आला. कोलकात्यात तब्बल तीन किलोमीटरपर्यंत विराट मोर्चा काढण्यात आला. मोर्चात हजारो नागरिक सामील झाले होते. राज्यात प्रत्येक जिल्हय़ांत हे आंदोलन करण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List