माळशेज घाट ढासळू लागला, धोकादायक दरडी सोडून भलत्याच ठिकाणी संरक्षक जाळ्या ठोकल्या
2012 मध्ये भगवानगड बस दरीत कोसळून माळशेज घाटात 32 जणांचा बळी गेला होता. मात्र त्यानंतरही सुरक्षेच्या नावाने बोंबच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या घाटात धोकादायक दरडी सोडून भलत्याच ठिकाणी संरक्षक जाळ्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यामुळे धो धो पावसात दरडी कोसळत असून भयंकर अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.
सावर्णेपासून एमटीडीसी जुन्नर हा 14 किमीचा रस्ता कल्याण-माळशेज घाटातून जातो. या रस्त्यावर वाहनचाल करताना पावसाळ्यात खड्ड्यातून वाट चुकवत कसरत करावी लागते, जागोजागी संरक्षण जाळ्या जीर्ण झाल्या असून काही कोसळल्या आहेत, पावसाळ्यात तसेच रात्री दाट धुक्यात रस्ता समजावा म्हणून पांढरे पट्टेदेखील मारले गेले नाहीत. त्यामुळे नेहमीच अपघात घडत आहेत. रस्त्याच्या कडेला झाडेझुडपे वाढल्याने वाट दिसत नाही, त्यातच दिशादर्शक फलक गायब असल्याने धोक्याची वळणे समजत नाहीत. असे असताना नको त्या ठिकाणी जाळ्या बसविण्यात आल्याने धोकादायक ठिकाणाचे दगड, ढिगारे कोसळून वाहतूककोंडी होते. याबाबत वाहनचालकांनी अनेकदा आवाज उठवूनही बांधकाम खात्याचे अधिकारी कानाडोळा करत असून 2012 सारखा पुन्हा मोठा अपघात घडल्यानंतर सरकारला जाग येणार का? असा सवाल केला जात आहे.
सायंकाळी सहानंतर प्रवास टाळा
15 जुलै रोजी घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला होता. मात्र असे धोकादायक हॉटस्पॉट अनेक ठिकाणी असल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे सायंकाळी सहानंतर शक्यतो प्रवास टाळावा अशी सूचना राष्ट्रीय महामार्ग पोलीस विभागाकडून देण्यात येत आहे. प्रवाशांनी आणि वाहनचालकांनी खबरदारी घेण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List