अध्यक्षांचं वागणं महाराष्ट्राच्या परंपरेला लाज आणणारं आहे, भास्कर जाधव भडकले
विधानसभेमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणानंतर विरोधकांना बोलू न दिल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विधानसभा अध्यक्ष दुतोंडी भूमिका घेतात, त्यांचं वागणं हे महाराष्ट्राच्या परंपरले लाज आणणारं आहे, अशा शब्दात शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर हल्ला चढवला. विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांची सालटी काढली.
”आज सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देत होते त्यावर आम्ही शांत होतो. मी पूर्णपणे भाषण ऐकलो. पण ते 293 वरचं भाषण नव्हतं. 101 चा प्रस्ताव जसा एखाद्या भागापुरता असतो तसा या मंत्र्यांनी उत्तर दिलं. ठाण्याचा, परभणीचा, बांधकाम, अंगणवाडी, पाण्याचा विषयांवर आम्हाला प्रश्न होते. पण उपमुख्यमंत्र्यांनी केवळ आणि केवळ राजकारण केलं. सभागृहात खोटं बोलत होते तरी मी ते मी शांतपणे ऐकून घेतलं. आदित्य ठाकरे नव्हते त्यामुळे मी बोलायला उभा राहिलो. अध्यक्षांना जर मला संधी द्यायची नव्हती. तर त्यांनी ते सांगायचं सौजन्य दाखवायला पाहिजे होतं.
अध्यक्ष इतके अंतर्यामी आहेत. की त्यांना आमच्या मनातलं कळतं. मी राईट ऑफ रिप्लाय मागितला ही गोष्ट खरी आहे तो त्यांनी नाकारायला हवा होता. हे अध्यक्ष स्वत:ला सरकार समजतात. आम्ही प्रश्न सरकारला विचारतो पण हे अध्यक्ष कस्टडियन म्हणून सरकारला वाचवण्यात धन्यता मानतात. पण महाराष्ट्राच्या विधानसभेची संपूर्ण परंपरा या अध्यक्षांनी धुळीस मिळवली आहे. या विधानभवनाला लक्षवेधी नाव द्या, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी अध्यक्षांना सुनावले
”एकनाथ शिंदे म्हणाले कोरोनाच्या काळात खिचडीत घोटाळा केला. खिचडीत घोटाळा केल्याचा कॉन्ट्रॅक्ट ज्याच्या नावावर आहे तो संजय माशेलकर आता त्यांच्या खात्यात आहे. त्यांचा पदाधकिारी आहे. त्याच्यावर कारवाई नाही केली. आमच्या सुरज चव्हाणला चौदा महिने जेलमध्ये टाकलं. आमच्या अंगाची लाही होते. जीव जळतो पण संधी मिळत नाही. हे काय फुशारक्या मारतात. अटल सेतू आम्ही बांधला. 1963 पासून अटल सेतूचा इतिहास आहे. काय तुमची लायकी आहे का? काय कर्तृत्व आहे? वरळी सी लिंक बांधला म्हणून सांगता. तुमचं यात कर्तृत्व काय आहे? मेट्रो आम्ही आणली म्हणून सांगतात. पहिल्या फेजला नगरविकास राज्य मंत्री म्हणून सही करणारा मी आहे. त्यावेळी कुठे होतात तुम्ही? तुम्ही क्रेडीट घ्यायला हरकत नाही. पण उठसूठ उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करायचे. यांनी काही केलं नाही. लाजा वाटला पाहिजे यांना. 2014 पासून तुम्ही मंत्रीमंडळात आहात. उपमुख्यमंत्री सांगत होते. गिरणी कामगारांना घरं देणार. चार दिवसांपूर्वी गिरणी कामगारांनी मोर्चा काढला. त्यांनी एक जीआर दाखवला. त्यात लिहलंय की त्यांनी वांगणी शेलू गावात घरं दिली जातयात. जर त्यांनी ती नाकारली तर हक्क जाईल. किती खोटं सांगतात हे सभागृहात. आणि आम्ही हे खोटं ऐकून घ्यावं अशी अध्यक्षांची भूमिका आहे. अध्यक्षांना देखील अदानीला वाचवायचं आहे. अध्यक्षांनी संपूर्ण सभागृहाची गरिमा धुळीस मिळवली आहे, अध्यक्ष दुतोंडी आहेत. हा डायरेक्ट आरोप आहे. त्यामुळेच आज गिरणी कामगारांचा विषय निघाला नाही, परभणीचा विषय निघाला नाही. नुसतं मुंबई मुंबई. तुमच्या हातात खातं आहे ना. उठसूठ सतत कसले आरोप करता. 14 वर्ष तुम्ही मंत्री होतात ना उपमुख्यमंत्री होतात, मुख्यमंत्री होतात. उद्धव ठाकरे दोन वर्ष मुख्यमंत्री होते. त्यावेळी कोरोनाचं संकट होतं. त्यांनी काम केले नाही मग तुम्ही काय करत होतात. प्रत्येक वेळी प्रश्न विचारता. उद्धव ठाकरेंवर टीका करताना लाज वाटली पाहिजे, असे भास्कर जाधव यांनी शिंदेना सुनावले.
”आम्हाला वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न विचारायचे होते. असंघटित कामगार, गिरणी कामगार, परभणीच्या विषयावर प्रश्न विचारायचा होता. मोनो रेल, अटल सेतू तुमच्या कारिकर्दीत आलेला नाही. नवी मुंबई एअर पोर्टमध्ये काय तुमचं कर्तृत्व आहे. मी नगरविकास राज्यमंत्री असताना तानाजी सत्रे म्हणून एमडी होते. आम्ही दोघांनी तेव्हा लोकांचा विरोध होत असताना त्यांना समजवण्याचं काम केलं होतं. तुम्ही काय केलं. बॅगा घेऊन सुरत गुवाहटीला गेलात. आज अध्यक्ष त्यांना समर्थन करतात. आज माझा अध्यक्षांवर राग आहे. उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यातील मिसिंग लिंकचा उल्लेख केला. हिंदुहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याळे 1995 साली युतीचे सरकार असताना मुंबई पुणे रस्ता झाला. त्यानंतर पुढचा एखादा टप्पा तुम्ही केला म्हणून मेहेरबानी केली काय, असा संतप्त सवाल भास्कर जाधव यांनी केला. अदानीच्या विषयावर उपमुख्यमंत्री गोल गोल करत असतात. नगरविकास मंत्र्यांना मुख्यमंत्री व अदानीने नगरविकास मंत्र्यांना चर्चेतच घेतलं नसेल, असा टोला देखील त्यांनी लगावला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List