डुप्लिकेट शिवसेनेसोबत बसून माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या असली शिवसेनेला सत्तेत येण्याची ऑफर देणं ही वैचारिक दिवाळखोरी – संजय राऊत
देवेंद्र फडणवीस आहेत ते टपल्या, टिचक्या, टोमणे मारण्यात पटाईत आहेत. ड्युप्लिकेट शिवसेनेसोबत बसून माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या असली शिवसेनेला सत्तेत येण्याची ऑफर देणं ही वैचारिक दिवाळखोरी आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप वर जोरदार टीका केली.
फडणवीसांनी बुधवारी विधानसभेत भाषण करताना शिवसेनेला सत्तेत येण्याची ऑफर दिली. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांची चांगलीच सालटी काढली. ”देवेंद्र फडणवीस आहेत ते टपल्या टिचक्या टोमणे मारण्यात पटाईत आहेत. त्याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज नाही. शिवसेना सर्वोच्च न्यायालयात एक लढा देतेय. आम्हाला खात्री आहे की आम्हाला न्याय मिळेल. त्यामुळे फडणवीसांसोबत जे ड्युप्लिकेट लोकं बसले आहेत. त्यांचा् विचार त्यांनी आधी करावा. नकली ठेवायचे की असली ठेवायचे. ड्युप्लिकेट शिवसेना, ड्युप्लिकेट राष्ट्रवादी सोबत त्यांचा कारभार सुरू आहे. त्यांना कुठला वैचारिक आधार नाही. अस असताना माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत येण्याची ऑफर देणं ही वैचारिक दिवाळखोरी, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी ते 2029 पर्यंत सत्तेत राहणार असं वक्तव्य केलं आहे, त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”राजकारण आणि बहुमत फार चंचल असतं. हे लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. उद्या काय होईल ते सांगता येत नाही. नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन युद्ध थांबवतील असं कुणाला वाटलं होतं का? आम्हाला असं वाटलं होतं की 56 इंचाची छाती असलेले लाहोर, कराची सर्व ताब्यात घेऊन तिथे तिरंगा फडकवून गप्प बसतील. अशाच त्यांच्या आरोळ्या होत्या. काय झालं त्याचं. आता त्यांच्या गर्जना बंद आहेत, असा टोला देखील संजय राऊत यांनी मारला.
अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभानंतर झालेल्या फोटोशूटवेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसण्यास नकार दिला. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता संजय राऊत म्हणाले, ”तुमची काय अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे यांनी त्यांना मांडीवर घेऊन बसायला हवे होते का? उद्धव ठाकरे हे एक स्वाभिमानी नेते आहेत. ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली. ज्यांनी ड्युप्लिकेट शिवसेना स्थापन केली. त्यांच्यासोबत हस्तांदोलन करायचे का? महाराष्ट्राला हे आवडलं नसतं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List