दहशतवाद्यांकडून ड्रोन्सचा घुसखोरी, हल्ल्यांसाठी वापर, लष्करी मोहिमा ठरताहेत फोल; अधिकाऱ्यांची कबुली
दहशतवाद्यांकडून जम्मू-कश्मीरमध्ये ड्रोन्सचा वापर ओवर ग्राऊंड वर्कस म्हणून केला जात आहे. त्यामुळे सुरक्षा दलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दहशतवाद्यांकडून या मानवरहित ड्रोन्सचा वापर घुसखोरी करण्यासाठी केला जात आहे, त्यामुळे असे ड्रोन्स हिंदुस्थानी लष्करासाठी आव्हान बनल्याची कबुली लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, देशातच ड्रोन्स तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज असल्याचे चीफ ऑफ डिफेन्स जनरल अनिल चौहान यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयकडून दहशतवाद्यांना जम्मू-कश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी ड्रोन्सचा वापर करण्यात येत आहे. कश्मीरसह किश्तवाड आणि राजौरी यांसारख्या उंच भागातील जंगलात लपलेले दहशतवादी आपल्या दिशेने येणाऱ्या लष्करी जवानांबद्दल सतर्प करण्यासाठी ड्रोन्सचा वापर करत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे दहशतवादविरोधी मोहिमा फोल ठरत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करत जल्लोष केला
पहलगाममध्ये तब्बल 26 पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या आणि माता-भगिनींचे पुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांनी हल्ल्यानंतर हवेत अनेक राऊंड गोळीबार करत जल्लोष केला होता, अशी माहिती हल्लेखोरांना मदत करणाऱ्या अटक आरोपींच्या चौकशीतून समोर आली आहे. एनआयकडून या आरोपींची कसून चौकशी आणि पुढील तपास सुरू आहे.
पीओकेत बैठका आणि एलओसीवर रेकी
मे महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात पाकिस्तान व्याप्त कश्मीरमध्ये आयएसआयच्या अधिकाऱ्यांनी बंदी घालण्यात आलेल्या जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांसोबत बैठका घेतल्या. यात एलओसीवर ड्रोनवरून रेकी वाढवण्याचा आणि पीओकेमधील स्थानिकांचा गाईड म्हणून वापर करण्याची योजना आखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List