लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क आता विसरा…सिंगापूर बनले जगातील सर्वात महागडे शहर
लंडन, पॅरिस, न्यूयॉर्कला मागे टापून सिंगापूर हे जगातील महागडे शहर बनले आहे. एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या रँकिंगवरून ही बाब समोर आलीय. स्वीसची फायनान्शिअल कंपनी ज्युलियस बेअर ग्रुपने त्यांची नवीन रँकिंग जाहीर केली आहे. ज्युलियस बेअर ग्लोबल वेल्थ अँड लाइफस्टाइल रिपोर्ट 2025 नुसार सिंगापूर, लंडन, मुंबई आणि इतर काही प्रसिद्ध शहरे जगातील सर्वात आलिशान व महागडे शहर आहेत. त्यातही सिंगापूरने अव्वल स्थान पटकावले आहे.
नवीन रँकिंगमध्ये लंडन आणि हाँगकाँगला मागे टाकत सिंगापूर सलग तिसऱ्या वर्षी अव्वल ठरले आहे. शहरांतील लोकांचे राहणीमान, आरामदायी जीवनशैली, त्यावर होणारा खर्च यावर आधारित हे सर्वेक्षण आहे. त्यानुसार कार आणि महिलांच्या हँडबॅग्जच्या बाबतीतही सिंगापूर अव्वल, तर महिलांच्या बुटांबाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी मालमत्ता आणि आरोग्य सेवेबाबतीत सिंगापूर शहर जगात तिसरे आहे. यादीत लंडन दुसऱ्या स्थानावर आहे, जिथे खासगी शाळांच्या शिक्षणात 26.6 टक्के वाढ झाली आहे आणि बिझनेस क्लास फ्लाइटच्या किमतीत 29.7 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तसेच हॉटेलच्या किमतींमध्ये 26.1 टक्के वाढ झाल्याने हाँगकाँग यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
मुंबईकरांचा रेस्टॉरंटवर जास्त खर्च
अहवालानुसार, मुंबईतील लोक विमान प्रवास (42 टक्के) आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण्यावर (44 टक्के ) सर्वाधिक खर्च करतात. तसेच हॉटेलमध्ये राहण्याचा आणि लक्झरी वस्तू खरेदीवर 12 व 9 टक्के करतात. आशियामध्ये सुमारे 13 टक्के लोक बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणे पसंत करतात.
दुबईचा नंबर सुधारला
गेल्या वर्षी दुबई या यादीत 12 व्या स्थानावर होते, पण आता सातव्या क्रमांकावर पोहोचले आहे. येथे रिअल इस्टेट, कमी कर आणि व्यवसायाच्या संधी यामुळे श्रीमंत लोक अधिकाधिक आकर्षित होत आहेत. लोक येथे केवळ सुट्टीसाठीच येत नाहीत, तर मालमत्तेत गुंतवणूकदेखील करतात.
आशियाई शहरांचा मोबाईलवर खर्च
जगातील सर्वात महागडय़ा आणि आलिशान शहरांच्या यादीत टॉप 20 शहरांपैकी आठ आशियातील आहेत. सिंगापूर, हाँगकाँग (तिसरे), शांघाय (सहावे) त्यानंतर बँका@क, टोकियो, जकार्ता, मुंबई आणि मनिला यांचाही समावेश आहे, पण हाँगकाँग (गेल्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर) आणि शांघाय (गेल्या वर्षी चौथे) या वेळी क्रमवारीत घसरण झाली आहे. आशियाई देशातील लोक मोबाईलवर आणि रेस्टॉरंटमधील खाण्यावर जास्त खर्च करतात. या दोन्हींचा खर्च 65 टक्के इतका आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List