अहमदाबाद एअर इंडिया अपघाताबाबत मोठा खुलासा; कॅप्टननेच विमानाच्या इंजिनचे इंधन केले बंद
गुजरातमधील अहमदाबाद येथे अपघात झालेल्या एअर इंडिया विमानाच्या दोन्ही वैमानिकांच्या शेवटच्या संभाषणाचे कॉकपिट रेकॉर्डिंग असे दर्शवते की कॅप्टनने विमानाच्या इंजिनचे इंधन बंद केले होते. ही माहिती अमेरिकन माध्यम वॉल स्ट्रीट जर्नलने दिली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात म्हटले आहे की, बोईंग 787 ड्रीमलायनर उडवणाऱ्या पहिल्या वैमानिकाने दुसऱ्या अधिक अनुभवी कॅप्टनला विचारले की, धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर लगेचच स्विच कटऑफ स्थितीत का ठेवला. अहवालानुसार यानंतर पहिल्या अधिकाऱ्याने भावना व्यक्त केली, तर कॅप्टन मात्र शांत राहिला होता.
विमान अपघातात कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर यांचाही मृत्यू झाला होता. त्यांना एकूण 15,638 तास आणि 3,403 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. वॉल स्ट्रीट जर्नलने एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AIIB) च्या प्राथमिक अहवालाचा हवाला दिला आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, दोन्ही इंजिनांचे इंधन कटऑफ स्विच टेकऑफनंतर काही क्षणातच एकामागून एक कटऑफ स्थितीत पोहोचले. अहवालानुसार टेकऑफ आणि क्रॅश दरम्यानचा वेळ फक्त 32 सेकंदांचा होता.
वॉल स्ट्रीट जर्नलने या प्रकरणातील तज्ञ, अमेरिकन वैमानिक आणि तपासावर लक्ष ठेवणाऱ्या सुरक्षा तज्ञांचा हवाला दिला आहे. या दिलेल्या तपशीलांवरून असे दिसून येते की, कॅप्टनने स्वतः स्विच बंद केले होते. अहवालात मात्र स्विच चुकून बंद केला गेला की, जाणूनबुजून बंद केला गेला हे स्पष्ट केलेले नाही.
नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते की, हा अहवाल केवळ प्राथमिक निष्कर्षांवर आधारित आहे आणि अंतिम अहवाल प्रसिद्ध होईपर्यंत कोणताही अंतिम निष्कर्ष काढता कामा नये.
फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स (एफआयपी) चे अध्यक्ष सीएस रंधावा यांनी गुरुवारी वॉल स्ट्रीट जर्नलच्या निराधार अहवालावर जोरदार टीका केली आणि कारवाईचीही चर्चा केली आहे. एआयआयबीच्या प्राथमिक अहवालात पायलटांनी इंजिनमध्ये इंधनाचा प्रवाह नियंत्रित करणारा स्विच बंद केल्याचा कोणताही उल्लेख नाही यावर रंधावा यांनी भर दिला. अंतिम अहवाल येईपर्यंत लोकांनी कोणताही निष्कर्ष काढू नये असे ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List