डोक्यावर हंडा घेऊन ग्रामस्थांची पायपीट, शहापूरच्या बिबळवाडीत ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई
कसारा घाट माथ्यावरील तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या बिबळवाडीत वर्षाचे बारा महिने पाणीटंचाई आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पाणीटंचाईचे शुक्लकाष्ट काही कमी होताना दिसत नाही. विद्युत तसेच सौरऊर्जेवर असलेली पाणी योजना गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईची झळ बिबळवाडी ग्रामस्थांना सोसावी लागत आहे. पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन रोज एक किमी पायपीट करावी लागते.
ठाणे व नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरील शहापूर तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या कसारा खुर्द ग्रामपंचायतमधील बिबळवाडीत 300 आदिवासी लोकवस्ती आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून बिबळवाडी पाणीटंचाईची झळ सोसत आहे. या वाडीत पाणी योजना नसल्याने कसारा घाटात असलेल्या एकमेव टोपाची बावडीमधून पाणी आणावे लागते.
टोपाच्या बावडीतील पाणी आणण्यासाठी महिला भगिनींना एक किमीची टेकडी चढ-उतार करावी लागते. एका कंपनीच्या सीएसआर निधीतून योजना राबवण्यात आली. मात्र योजनेची मशीन गेल्या वर्षभरापासून बंद असल्याचे ग्रामस्थांचे पुन्हा एकदा पाणी हाल सुरू आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे महिलांपासून ते शाळकरी मुलांपर्यंत सगळ्यांनाच या टंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे पाण्याअभावी शेतकऱ्यांना जनावरेही विकावी लागत आहेत.
चिखलाची पायवाट, दगड गोट्यांचे अडथळे
डोक्यावर पाण्याने भरलेले दोन-तीन हंडे घेऊन चिखलाची पायवाट दगड गोट्यांचे अडथळे पार करून येथील ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. रखरखीत उन्हात आणि भर पावसात तेथील महिला भगिनींना रोजच पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. आम्हाला जगायला फक्त थोडं स्वच्छ पाणी हवं आहे, पण तेही मिळत नाही अशी अगतिकता येथील मायभगिनींनी व्यक्त केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List