जुन्या शस्त्रांनी युद्ध जिंकणार कसे? सीडीएस जनरल अनिल चौहान यांचा सडेतोड सवाल
जुनाट शस्त्रास्त्रांनी युद्धे कधीच जिंकले जाऊ शकत नाही. हिंदुस्थानातील शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. परदेशातून आयात करण्यात आलेल्या तंत्रज्ञानावर आपले वाढत चाललेले अवलंबित्व हिंदुस्थानी लष्कराची युद्ध नीती कमजोर करत आहे, असे परखड मत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केले. दिल्लीतील मानेकशॉ सेंटर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या मतामुळे फ्रान्सकडून घेण्यात आलेली राफेल तसेच विविध परदेशी तंत्रज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
स्वदेशी सी-युएएस अर्थात काऊंटर अनमॅन्ड एरियल सिस्टम म्हणजेच अँटी ड्रोन यंत्रणा का गरजेची आहे, हे आपल्याला ऑपरेशन सिंदूरने दाखवले. त्यामुळे अद्ययावत संरक्षण प्रणालीसाठी आपल्याला गुंतवणूक करावीच लागेल. ऑपरेशन सिंधूरदरम्यान पाकिस्तानने अनआर्म्ड ड्रोन्सचा वापर केला. परंतु, आपण जास्तीत जास्त ड्रोन्स हाणून पाडले. अशा प्रकारची ड्रोन आपल्या कुठल्याही प्रकारच्या लष्करी आणि नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान करू शकत नाही, असेही चौहान म्हणाले.
परदेशी तंत्रज्ञानावर विश्वास नाही; स्वदेशीच हवे
जर आपण महत्वाच्या मोहिमांसाठी परदेशी तंत्रज्ञानावर निर्भर राहिलो तर आपली युद्धनीती कमजोर होऊ शकते. परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्यामुळे आपली स्वदेशी शस्त्रास्त्र निर्मितीची क्षमता घटत चालली आहे, स्वदेशीसाठीच पुढाकार घ्यायला हवा. हिंदुस्थानने स्वतःचे तंत्रज्ञान स्वतः विकसित करायला हवे. जेणेकरून युद्धात हिंदुस्थानी लष्कर कुठल्याही बाजूने कमी पडणार नाही, असेही चौहान म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List