पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या जवानाला जम्मू-कश्मीरमधून अटक, ISI ला संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या जवानाला जम्मू-कश्मीरमधून अटक करण्यात आली आहे. देविंदर सिंग असे अटक करण्यात आलेल्या जवानाचे नाव असून तो पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील निहालगड येथील रहिवासी आहे. देविंदर सिंग याला एसएसओसीच्या पथकाने 14 जुलै रोजी जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथून अटक केली. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला लष्कराची अनेक संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
एसएसओसीचे एआयजी रवज्योत कौर ग्रेवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी माजी सैनिक गुरप्रीत सिंग उर्फ गुरी उर्फ फौजी याला अटक करण्यात आली होती. त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली.
चौकशी दरम्यान असे समोर आले की, फिरोजपूर तुरुंगात बंद असताना गुरप्रीत सिंग याची देविंदर सिंग याने मदत केली होती. देविंदर लष्कराची संवेदनशील कादगपत्रे मिळवण्यात सहभागी होता. या कादगपत्रांमध्ये गोपनीय माहिती होती आणि ती त्याने आयएसआयला दिली होती. या प्रकरणी देविंदरला 14 जुलैला अटक करण्यात आली आणि 15 जुलैला त्याला मोहालीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
देविंदर सिंग आणि गुपप्रीत सिंग यांची पहिली भेट पुण्यात झाली होती. 2017 मध्ये पुण्यातील एका लष्करी छावणीत प्रशिक्षणा दरम्यान दोघे भेटले होते, असे तपासातून समोर आले आहे. त्यानंतर दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. काही कालावधीनंतर दोघांना सिक्कीम आणि जम्मू-कश्मीरमध्ये तैनात करण्यात आले होते.
लष्करामध्ये सेवा देत असताना दोघांनाही गोपनीय माहिती मिळत होती. ही माहिती गुरप्रीत सिंग उर्फ गुरी उर्फ फौजी याने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला दिली. या प्रकरणी आता दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीतून आणखी काही महत्त्वाची माहिती उघड होण्याची शक्यता आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List