महाराष्ट्रद्रोह्यांना धडकी भरवणारा उद्या ऐतिहासिक विजयी मेळावा! मराठी माणसाची ठाकरी गर्जना ऐकायला डरकाळी फोडत या, शिवसेना-मनसेकडून संयुक्त टिझर जारी
पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती लादणाऱया महायुती सरकारला मराठी माणसाच्या एकजुटीपुढे गुडघे टेकावे लागले. त्या यशाचा विजयोत्सव शनिवारी प्रचंड जल्लोषात साजरा होणार आहे. अभूतपूर्व अशा या ऐतिहासिक विजयी मेळाव्यासाठी शिवसेना आणि मनसेचा संयुक्त टिझर आज जारी करण्यात आला. मराठीची एकजूट दाखवून महाराष्ट्राची वज्रमूठ घट्ट आवळून मराठी माणसाची ठाकरी गर्जना ऐकायला डरकाळी फोडत या, असे आवाहन या टिझरद्वारे करण्यात आले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्यात एकाच व्यासपीठावर येणार आहेत. महाराष्ट्रासाठी आणि तमाम मराठीजनांसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे. त्याचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम मराठी माणूस मोठय़ा संख्येने शनिवारी वरळी डोम येथे होणाऱया विजयी मेळाव्याला येणार आहे.
टीझरला तुफान प्रतिसाद
विजयी जल्लोष मेळाव्यासाठी शिवसेना आणि ‘मनसे’कडून कार्यक्रमाचा टीझर प्रसारित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये सिंहासारख्या दोन लढवय्या भावांची गोष्ट अत्यंत प्रभावीपणे सांगितली गेली आहे. काही रानकुत्र्यांनी जंगलात उच्छाद घातला होता. एकदा सिंहाला एकटं पाडून रानकुत्र्यांनी डाव साधायचं ठरवलं. मग रानकुत्र्यांच्या झुंडीने त्या सिंहावर हल्ला चढवला. तो सिंह निकराने, जिद्दीने त्या रानकुत्र्यांशी झुंजत होता. हे सर्व त्या सिंहाच्या भावाने पाहिलं. तोही त्या लढाईत सामील झाला आणि त्या दोन भावांनी हिंस्र झुंडीला पळवून लावलं. ….आणि त्या दोन लढवय्या भावांच्या शक्तीने जंगल रानकुत्र्यांच्या झुंडीपासून मुक्त झालं!’ असा टीझरचा आशय आहे.
कोण आला रे कोण आला… महाराष्ट्राचा वाघ आला
टीझरच्या शेवटी ह्या गोष्टीचा अर्थ महाराष्ट्राला समजला असेलचं असे सांगत ही गोष्ट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्रद्रोह्यांविरुध्द केलेल्या संघर्षाची ग्वाही देते असे अधोरेखित करण्यात आले आहे. गोष्ट सुरू असतानाच पार्श्वभूमीवर कोण आला रे कोण आला…महाराष्ट्राचा वाघ आला हे गीतही वाजते. त्यामुळे टीझर अधिक प्रभावी झाला आहे.
सरकारला कोणी नमवलं?…मराठीजनांनी
मुंबईत ठिकठिकाणी या मेळाव्याचे मराठी माणसाला निमंत्रण देणारे हार्ंडग झळकले आहेत. हार्ंडगवर ‘सरकारला कोणी नमवलं?…मराठीजनांनी’ अशा ठळक शीर्षकाखाली मेळाव्याचे निमंत्रण मराठी माणसाला देण्यात आले आहे. ‘मराठी माणसाने एकजुट आणि एकत्र यावे हीच काळाची खरी गरज व आमची ताकद’ अशा आशयाचे बॅनर वरळी, दादर, परळ, लालबाग या भागात लावण्यात आले आहेत.
आज रंगीत तालीम
विजयी मेळावा अत्यंत नियोजनबद्धरित्या साजरा होईल याची काळजी घेण्यात येत आहे. त्यासाठी मेळाव्याची रंगीत तालीम शुक्रवारी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
मुंबईभर एलईडी स्क्रीनवर प्रक्षेपण
मेळावा सर्वदूर पाहता यावा यासाठी मुंबईच्या विविध भागांमध्ये मोठय़ा स्क्रीन लावून थेट प्रक्षेपण करण्याची तयारीही शिवसेना आणि मनसेने केली आहे.
स्थळः एनएससीआय डोम, वरळी
वेळः सकाळी – 11 वाजता
ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा
सोशल मीडियात या पोस्ट तुफान गाजताहेत…
महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतोय, तो क्षण साजरा करायला या!
छत्रपतींचे स्वाभिमानी मावळे आहोत आपण… गड सर केल्यावर जल्लोष करणारच!
विजयाचा सोहळा असा साजरा करूया की भविष्यात ‘मराठी’कडे
कुणी वाकडय़ा नजरेने पाहणार नाही!
मराठीचा डंका जगात वाजवायचा तर एकजूट
भक्कम हवी. चला, मराठी
मनाची वीण मजबूत करूया!
हा आपला ‘कुटुंबसोहळा’ आहे. मराठी माणसाचा ‘आनंदमेळा’ आहे. आवर्जून या!
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List