पिंजाळ नदीवर पूल बांधण्याची मागणी 15 वर्षांपासून दुर्लक्षित, ‘सामना’तील फोटोवर विधानसभेत चर्चा
पालघर जिह्यातील विक्रमगडमधील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून पिंजाळ नदीतून टायर-टय़ूबवर बसून शाळेत जावे लागते. या सर्व विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका आहे. पिंजाळ नदीवर पूल बांधण्यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून गावकरी मागणी करीत आहेत, पण प्रशासन पुलाच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकारने पूल बांधेपर्यंत या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी अशी मागणी विक्रमगडचे भाजप आमदार हरिश्चंद्र भोये यांनी आज विधानसभेत केली.
वाहतुकीची व्यवस्था करा
इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी डोक्यावर दप्तर घेऊन नदीतून टायर-टय़ूबवरून प्रवास करतात. शाळेत जाईपर्यंत विद्यार्थी पूर्ण भिजतात. अनेकदा त्यांची शाळा चुकते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे पिंजाळ नदीवर त्वरित पूल बांधण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी संबंधितांना द्यावेत. तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था सरकारने करावी अशी मागणी हरिश्चंद्र भोये यांनी केली.
औचित्याचा मुद्दा
पालघर जिह्यातील विक्रमगडच्या म्हसे गावातील आदिवासी विद्यार्थी टायर-टय़ूबवर बसून पिंजाळ नदीतून जिवावर उदार होऊन शाळेत जात असल्याचे छायाचित्र गुरुवारच्या दै. ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाले होते. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेली शिक्षणाची ही दारुण अवस्था या फोटोने चव्हाटय़ावर आणली. हा फोटो आज विधानसभेत गाजला. भाजपचे विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे या गंभीर समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List