सामना अग्रलेख – हेलावून टाकणारी दुर्घटना

सामना अग्रलेख – हेलावून टाकणारी दुर्घटना

अहमदाबाद येथे झालेली विमान दुर्घटना अक्षरशः मन हेलावून टाकणारी आहे. त्यामुळे सारा देशच शोकमग्न झाला आहे. ही दुर्घटना कशी घडली हे तपासामधून बाहेर येईलच, परंतु भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी काय करायला हवे, याचाही गांभीर्याने विचार संबंधित यंत्रणांना करावा लागेल.

गुजरातमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमुळे सारा देश सुन्न झाला आहे. गुरुवारी दुपारी अहमदाबादहून लंडनकडे जाण्यासाठी निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला उड्डाणानंतर लगेचच अपघात झाला आणि काही मिनिटांच्या आत हे विमान जळून खाक झाले. दुर्घटना झाली त्या वेळी बोइंग- 787 ड्रीमलायनर जातीच्या एआय-171 या महाकाय विमानात 230 प्रवासी, दोन वैमानिक व अन्य 10 क्रू मेंबर्स असे एकूण 242 जण होते. या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह 169 हिंदुस्थानी, 53 ब्रिटिश नागरिक, 7 पोर्तुगीज व एक कॅनडियन नागरिक प्रवास करत होते. या सर्वांचाच या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते, मात्र एक प्रवासी दैव बलवत्तर म्हणून आश्चर्यकारकरीत्या वाचला आहे. दुपारी 1 वाजून 17 मिनिटांनी अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने उड्डाण घेतले. मात्र ‘टेक-ऑफ’नंतर काही सेकंदांतच या विमानाचा रडारशी संपर्क तुटल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर पुढच्या पंधरा मिनिटांत अहमदाबाद शहराच्या मेघानीनगर भागात हे विमान कोसळले. आगीच्या गोळ्यात विमानाचे रूपांतर झाले व

हादरवून टाकणारा स्फोट

होऊन ते भस्मसात झाले. या विमान दुर्घटनेचे संभाव्य कारण सांगितले जात आहे. त्यानुसार विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला व त्यामुळे हा अपघात घडला. उड्डाणानंतर विमान एका इमारतीवर जाऊन आदळले आणि एका क्षणात भयंकर स्फोट होऊन ते खाक झाले. काही प्रत्यक्षदर्शींच्या मते विमान एका भिंतीवर कोसळले. विमान दुर्घटनेचे नेमके कारण चौकशीअंती समोर येईलच, मात्र आजघडीला अहमदाबादमध्ये जी परिस्थिती आहे, ती अंगावर शहारे आणणारी आहे. कारण विमान दुर्घटनेची झळ केवळ विमानातील प्रवाशांनाच बसली असे नव्हे, तर हे विमान रहिवाशी भागात कोसळल्याने एकूण मृत आणि जखमींचा आकडा जास्त असण्याची शक्यता आहे. उड्डाणानंतर विमानाला बसलेले हेलकावे, त्यानंतर इमारतीला धडक, मग स्फोट आणि अग्निप्रलय असा घटनाक्रम असलेल्या या थरारक दुर्घटनेतील मृतांचा आकडा किती मोठा असेल याची कल्पनाही करवत नाही. मेघानीनगर या दाट वस्ती असलेल्या भागातील ज्या इमारतीवर हे विमान कोसळले ते

डॉक्टरांचे वसतिगृह

होते. दुर्घटना घडली त्या वेळी या हॉस्टेलमध्ये अनेक डॉक्टर जेवण करत होते. त्याच वेळी विमान हॉस्टेलवर पडत असताना पाहून डॉक्टरांना डोळ्यांसमोर साक्षात मृत्यू दिसला. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. अपघातग्रस्त विमानाची धुरा कॅप्टन सुमित सभरवाल आणि क्लाईव्ह कुंदर हे अनुभवी पायलट सांभाळत होते. मात्र बचावाची कोणतीही संधी त्यांना मिळाली नाही. 28 वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या विमान अपघाताची आठवण करून देणारी ही दुर्घटना आहे. 26 एप्रिल 1993 रोजी मुंबईला जाणारे इंडियन एअरलाइन्सचे विमान उड्डाणानंतर धावपट्टी संपल्याबरोबर लगतच्या रस्त्यावरील एका ट्रकवर आदळले होते आणि असाच स्फोट होऊन 55 लोक मृत्युमुखी पडले होते. ते विमान ट्रकवर आदळले आणि अहमदाबादचे विमान इमारतीवर, एवढाच काय तो फरक. अहमदाबाद येथे झालेली विमान दुर्घटना अक्षरशः मन हेलावून टाकणारी आहे. त्यामुळे सारा देशच शोकमग्न झाला आहे. ही दुर्घटना कशी घडली हे तपासामधून बाहेर येईलच, परंतु भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी काय करायला हवे, याचाही गांभीर्याने विचार संबंधित यंत्रणांना करावा लागेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;