‘ड्रीमलायनर’ खरंच सुरक्षित आहे का? बोइंग विमानाचे 6 हजार अपघात, 9 हजार ठार
अहमदाबाद विमान दुर्घटनेआधी बोइंग विमानाचे जगभरात जवळपास 6 हजार अपघात झाले असून यामध्ये 9 हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामुळे बोइंगचे ‘ड्रिमलायनर’ विमान खरोखरच सुरक्षित आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. जगभरातील प्रवासी विमानात 4 हजारांहून जास्त विमाने ही बोइंग 737-800 हे आहेत. आशिया, युरोप आणि उत्तरी अमेरिकेच्या काही महाद्विपमध्ये बोइंग विमानाचा वापर केला जातो. परंतु, गेल्या काही वर्षांपासून बोइंग विमानाला सातत्याने अपघात होत आहे. बोइंग 737 मॅक्स या विमानाचा तपास केल्यानंतर यामध्ये मॅन्युवरिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑग्मेंटेशन सिस्टम (एमसीएएस) संबंधी एक समस्या आढळून आली होती. या सिस्टमने मॅन्युअली लँडिंगवरील अवलंबता कमी केली होती. परंतु, पायलटला माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे 2018 – 2019 मध्ये 346 प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर या विमानाचे उड्डाण थांबवण्यात आले होते. यानंतर याला अपडेट करून त्याचे नाव बोइंग 737-800 असे ठेवले.
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये उड्डाणावेळी 737 मॅक्स या विमानाचा प्लग हवेत उडाला होता. तसेच 2018 आणि 2019 मध्ये बोइंग 737 मॅक्स विमान कोसळले होते. 2018 आणि 2019 या दोन वर्षात झालेल्या दुर्घटनेत 189 आणि 157 लोकांचा मृत्यू झाला होता. 2024 मध्ये दक्षिण कोरियामध्ये बोइंगचे विमान कोसळून यात 180 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
हिंदुस्थानातील सर्वात मोठा विमान अपघात, 349 ठार
12 नोव्हेंबर 1996 साली सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी हरयाणातील चरखी दादरी येथे झालेला विमान अपघात हा हिंदुस्थानातील सर्वात मोठा अपघात मानला जातो. या अपघातात दोन विमाने हवेतच एकमेकांना धडकले होती. या अपघातात तब्बल 349 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. हा विमान अपघात इतका भयानक होता की, या विमानाचे तुकडे बरेच लांब फेकले गेले होते. सौदी अरबहून येणारे सौदीचे विमान 763 (बोइंग 747) आणि कझाकिस्तानहून दिल्लीकडे येणारे विमान 1907 या दोन विमानांत टक्कर झाली. सौदीच्या विमानात 312 प्रवासी, तर कझाकिस्तानचे हे चार्टर्ड विमान होते. यात 37 पर्यटक होते.
एअर इंडियाचे अपघात
22 मे 2010 ः 158 मृत्यू
एअर इंडियाचे एक्सप्रेस विमान बोइंग 737-800 या विमानाला मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमान लँडिंग होत असताना अपघात झाला. या दुर्घटनेत तब्बल 158 प्रवाशांचा मृत्यू झाला. या विमानात एकूण 166 प्रवासी होते. हे विमान दुबईहून मंगळुरूला येत होते. लॅण्डिगवेळी हवामान ठिक नव्हते. तसेच रनवे छोटा आणि उंचावर होता. हा अपघात पायलटच्या चुकीमुळे झाल्याचे नंतर स्पष्ट झाले.
3 जून 2019 ः 13 ठार
एनएन-32 या विमानाला 3 जून 2019 ला भीषण अपघात झाला. या विमानात एकूण 13 जवानांचा मृत्यू झाला होता. हे विमान आसामच्या जोरहाटहून अरुणाचल प्रदेशच्या मेचुका अॅडव्हान्स्ड लँडिंग ग्राऊंडकडे जात होते. तेव्हापासून हे विमान बेपत्ता झाले होते. यामध्ये एकूण 13 जण प्रवास करत होते. चालक दलाचे आठ सदस्य आणि पाच प्रवासी होते. या विमानाचे अवशेष आठ दिवसांनंतर म्हणजेच 11 जूनला मिळाले होते.
7 ऑगस्ट 2020 ः 21 मृत्युमुखी
7 ऑगस्ट 2020 रोजी केरळमधील कोझिकोड येथे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान बोइंग 737-800 हे धावपट्टीवरून घसरून कोसळले. या अपघातामध्ये एकूण 21 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 110 जण प्रवासी जखमी झाले होते. या विमानात एकूण 191 प्रवासी होते. मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे या विमानाला अपघात झाला. विमानाचे दोन तुकडे झाले होते.
दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने मुलगा बचावला
एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर अवघ्या दुसऱ्या मिनिटाला हॉस्टेलवर कोसळले. या हॉस्टेलमध्ये दुपारचे जेवण करण्यासाठी मुलगा गेला होता. त्याच ठिकाणी विमान कोसळले. मला वाटले आता सगळे संपले, परंतु देवाचे आभार मानावे लागेल. माझा मुलगा सुखरूप आहे, अशी आपबिती रमीला नावाच्या महिलेने सांगितली. दुर्घटनेवेळी माझा मुलगा त्याच ठिकाणी होता. विमान येत असल्याचे दिसताच मुलाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. त्यामुळे तो सुखरूप बचावला. मी माझ्या मुलाशी संवाद साधला. त्याने सांगितले की, आई मी ठीक आहे. फक्त थोडी किरकोळ दुखापत झाली आहे असे या महिलेने सांगितले.
अहमदाबाद एअरपोर्ट तात्पुरते बंद
विमान दुर्घटनेनंतर अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल एअरपोर्ट बंद ठेवण्यात आले. पुढील सूचना मिळेपर्यंत विमान सेवा बंद राहणार असल्याचे सरदार वल्लभभाई पटेल एअरपोर्टच्या प्रवक्त्याने सांगितले. प्रवाशांनी संबंधित एअरलाईन्सशी संपर्कात रहावे. तिथे अपडेट मिळेल. नवीन सूचना आल्यावर शेअर करण्यात येईल, असे प्रवाशांना सांगण्यात आले. या दरम्यान दिल्लीवरून अहमदाबादला येणारी उड्डाणे रद्द झाली. त्यानंतर हळूहळू विमान सेवा पूर्ववत झाली.
एअर इंडियाचा प्रोफाईल फोटो ब्लॅक
एअर इंडियाने दुःखद घटनेची माहिती ‘एक्स’वर शेअर केली. एअर इंडियाने एक्स हॅडलवरचा प्रोफाईल फोटो ब्लॅक केला. ‘घटनेबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आम्ही 1800 5691 444 हा एक पॅसेंजर हॉटलाइन नंबर सुरू केला आहे. या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना एअर इंडिया पूर्ण सहकार्य करत आहे. एअर इंडिया एक्स हँडल आणि वेबसाईटवर या घटनेचे सर्व अपडेट्स व माहिती शेअर करेल,’ असे कंपनीने सांगितले.
दुर्घटनेनंतर टाटा समूहाचे शेअर्स घसरले
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर याचा थेट परिणाम टाटा समूहाच्या शेअर्सवर दिसला. सेन्सेक्समधील टाटा ग्रुपच्या प्रमुख कंपन्या टाटा मोटर्स, टायटन, टाटा स्टील आणि टीसीएस कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली. टाटा मोटर्सचे शेअर्स 2.98 टक्के, टायटनचे शेअर्स 2.62 टक्के तर टाटा स्टील 2.44 टक्के घसरले. दरम्यान, इंडिगो आणि स्पाईसजेट विमान कंपनीच्या शेअर्समध्येही घसरण झाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List