एसटीत आता ब्लाईंड स्पॉट कॅमेरे लागणार, संपूर्ण 360 अंशातून निगराणी होणार
एसटी महामंडळाच्या नव्या बसेस मध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी खास ब्लाइंड स्पॉट कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे हे कॅमेरे 360 अंशातून निगराणी करणार आहेत. त्यामुळे एसटीच्या येणाऱ्या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ते ठाण्यात एआय तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली बसवलेल्या स्मार्ट एसटी बसेसची पाहणी करताना बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक आणि एसटीचे अधिकारी उपस्थित होते
एआय तंत्रज्ञानावर आधारित ” एकात्मिक सुरक्षा प्रणाली “
उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, सध्या दररोज सरासरी ५५ लाख प्रवाशांना दळणवळण सेवा देणारी एसटी भविष्यात अधिक सुरक्षित झाली पाहिजे, या उद्देशाने एआय तंत्रज्ञानावर आधारित ” एकात्मिक सुरक्षा प्रणाली ” नव्या बसेस ना बसविण्यात येणार आहे. चालकाच्या बस चालवण्याच्या पद्धतीपासून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या हालचालीवर देखरेख करणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरा बरोबरच मनोरंजनासाठी वायफाय, जाहिरात प्रसारासाठी एलईडी स्क्रीन, तसेच जीपीएस प्रणाली सह फोम बेस आग प्रतिबंधक प्रणाली देखील बसविण्यात येणार आहे.
परिवहन मंत्री आग्रही होते
या स्मार्ट बसेस बनवण्यासाठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे आग्रही होते. त्यांच्या सातत्य पुर्ण प्रयत्नांचे कौतुक करावं तितकेच थोडंच आहे असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. कारण त्यांनी भविष्याचा विचार करून एसटीमध्ये आमुलाग्र बदल करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यांच्या प्रयत्नाला महाराष्ट्र शासनाची योग्य ती साथ लाभेल याची मी यावेळी ग्वाही देतो असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
स्मार्ट बसची वैशिष्ट्ये..
प्रगत ड्रायव्हर सहाय्य प्रणाली (ADAS) आणि ड्रायव्हर मॉनिटरिंग कॅमेरा – समोरून होणाऱ्या धडकेची सूचना, लेन बदलण्याची सूचना, ड्रायव्हर स्थिती निरीक्षण, पादचाऱ्यांशी होणाऱ्या धडकेची सूचना इत्यादी सुविधा.
ब्लाइंड स्पॉट कॅमेरे: संपूर्ण 360 अंश कॅमेरे ( समोर, मागे, उजवीकडे 180 अंश आणि डावीकडे 180 अंश )
व्हिडीओ निरीक्षणासाठी कॅमेरे: प्रवाशांसाठी आत 2 कॅमेरे, समोरील कॅमेरा, मागील कॅमेरा
प्रवासी मोजणी सेन्सरची सुविधा
कॅमेर्यांच्या दृश्यांसह ड्रायव्हर सहाय्य स्क्रीन
4G आणि GPS ट्रॅकिंग आणि स्टोरेजसह मोबाइल NVR प्रणाली
जाहिराती आणि मार्ग प्रदर्शनासाठी LCD स्क्रीन
मार्ग प्रदर्शनासाठी तीन LED स्क्रीन ( समोर, बाजूला आणि मागे )
बसमध्ये सूचना देण्यासाठी सार्वजनिक घोषणा प्रणाली
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List