Rain Alert : आला आला वारा, संगे पावसाच्या धारा, आज आणि उद्या वादळी पाऊस, हवामान खात्याचा काय इशारा
राज्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर राज्यात पूर्व मौसमी वारे सुद्धा सक्रिय झाल्याने मे महिन्यातील उन्हाळा पावसाळ्यात बदलल्याचे दिसून येत आहे. मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पूर्व मौसमी वाऱ्यांची सक्रियता दिसत आहे. त्यामुळे मान्सून येण्यापूर्वीच पूर्व मौसमी पावसाची थाप राज्याच्या दारावर पडण्याची शक्यता आहे. यावेळी मान्सून लवकर धडकण्याची शक्यता आहे.
ढगांचा गडगडाट
मुंबईमध्ये १६ आणि १७ मे रोजी वादळी वारा आणि ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट दिसून येईल. धुवांधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह आजूबाजूच्या उपनगरांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यातच राज्यातील विविध भागात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.
सरासरीपेक्षा जास्त पाऊस
मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या पुढील चार आठवड्यांच्या अंदाजानुसार राज्यासह देशातील अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळणार आहे. दुसरीकडे ३१ मे रोजी मॉन्सून केरळात दाखल होईपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रात गडगडाटी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. १५ ते २२ मे दरम्यान महाराष्ट्र, ओडिशासह दक्षिण व ईशान्य भारतातील अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. २२ ते २९ मेदरम्यान राज्यासह पश्चिम किनारपट्टी आणि दक्षिण व पूर्व भारतात पाऊस सरासरी ओलांडेल
२९ मे ते ५ जूनदरम्यान कर्नाटक, बंगालच्या खाडी किनारी आणि ५ ते १२ जूनदरम्यान महाराष्ट्र व कर्नाटकात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल. अरबी समुद्रावर आणि तेलंगणा राज्यावर केंद्र असलेल्या दोन चक्रीय वाऱ्यांच्या संयोगातून सध्या वळवाच्या पावसाची शक्यता आहे. त्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत या पावसाचा प्रभाव अधिक असेल. या भागातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List