सोसाट्याचा वारा अन् तुफान सरी, मुंबईत पुन्हा पाऊस; लोकलच्या वेळापत्रकाचं काय?
मान्सूनने महाराष्ट्रात जोरदार धडक दिली आहे. यंदा मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर आला आहे. मान्सूच्या पहिल्याच पावसात मुंबईची मात्र दाणादाण उडाली. पुढचे काही दिवस जोददार पाऊस बरसणार असल्याचे सांगितले जात आहे. असे असतानाच काही तासांच्या विश्रांतीनंतर मुंबई तसेच उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कांदिवली, ठाणे, बोरीवली, दहिसर, लोअर परेल यासारख्या भागात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे.
पाऊस नेमका कुठं-कुठं बरसतोय?
मुंबईत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दादर परिसरात सोसाट्याचा वारा सुटला आहे. या सोसाट्याच्या वाऱ्यासह या भागात मुसळधार पाऊस बरसताना दिसतोय. असाच पाऊस चालू राहिला तर त्याचा फटका लोकच्या वेळापत्रकाला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दादर परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
ठाण्यातही पावसाची हजेरी
ठाण्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ठाण्यातीली वंदना बस डेपो परिसरात पावसाचे पाणी साचायला सुरुवात झाली आहे. हे पाणी साचू नये म्हणून पालिकेच्या वतीने सकल भागात सक्शन पंप लावण्यात आले आहेत. तर दुसरीकडे पावसामुळे साचलेल्या पाण्यातून वाहने वाट काढताना दिसत आहेत.
घाटकोपर परिसरात बाजारपेठा ठप्प
घाटकोपर परिसरातही जोरदार पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे. या परिसरातील बाजारपेठ पावसामुळे ठप्प झाल्या आहेत. मागच्या 1 तासांपासून पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. अंग भिजू नये म्हणून नागरिक वेगवेगळ्या दुकानांच्या छताखाली थांबताना दिसतायत.
मुंबई उपनगरात पुन्हा पाऊस सुरू झाला.
मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, अंधेरी, गोरेगाव या भागात गेल्या 15 मिनिटांपासून पाऊस बरसत आहे. या भागात काळे ढग जमा झाले असून विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आहे. सध्या कुठेही पाणी साचलेले नाही.
लोकलच्या वेळापत्रकाचं काय?
दरम्यान, मुंबई आणि उपनगरांत पवासाला सुरूवात झाल्यामुळे याचा फटका लोकलच्या वेळापत्रकावर पडण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊनच चाकरमान्यांनी आपले नियोजन करावे, असे आवाहन केले जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List