Sanjay Raut : मविआ सरकार पाडायचं दिल्लीतच ठरलं होतं, भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा राऊतांकडून गौप्यस्फोट काय?
सध्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिंदबरम यांच्या इंडिया आघाडीविषयीच्या वक्तव्याने राजकारण पेटले आहे. या आघाडीच्या अस्तित्वावरच त्यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा कट दिल्लीत शिजल्याचे ते म्हणाले. इतकेच नाही तर त्यांनी भाजप नेत्याच्या त्या धमकीच्या फोनचाही उल्लेख केला. काय म्हणाले संजय राऊत?
अन् काय आहे तो गोप्यस्फोट?
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याविषयी संजय राऊत यांनी आजच्या पत्र परिषदेत मोठे वक्तव्य केले. “मी त्यांचं नाव घेतलं नाही. एक ज्येष्ठ नेते माझे चाहते होते. ते म्हणाले, तुम्ही हे सरकार बनवलं ते आम्ही पाडतोय. ते सरकार आम्ही कोणत्या परिस्थितीत ठेवायचं नाही, असा दिल्लीत निर्णय झाला.” असा गौप्यस्फोट राऊतांनी केला.
तर तुरुंगाची धमकी
यावेळी भाजपच्या नेत्याने आपल्याला तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याचा दावा राऊतांनी केला. “मी म्हटलं तुम्ही बेकायदेशीर सरकार कसे पाडणार. ते म्हणाले, नाही आम्ही पाडू शकतो. पण आम्हाला तुमची चिंता वाटते. तुम्ही आमचे मित्र आहात. तुम्ही या भानगडीत पडू नका. नाही तर तुम्हाला तुरुंगात पाठवण्याची व्यवस्था झाली आहे. मी म्हटलं, मी काय केलं? ते म्हणाले, तुम्ही काही करण्याची गरज नाही. देशात राज्य कुणाचं आणि कसं सुरू आहे हे तुम्हाला माहीत आहे.” अशी माहिती राऊतांनी दिली.
ताबडतोब मी हा सर्व तपशील राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना कळवला. कारण मी राज्यसभेचा सदस्य आहे. मला अशा प्रकारे काल रात्री अमूक अमूक व्यक्तीने धमक्या दिल्याचं नायडूंना सांगितलं. आणि दोन महिन्यात ते सत्य झालं, असे राऊत म्हणाले. संजय राऊत यांचे तुरूंगातील दिवसांवर ‘नरकातील स्वर्ग’ असे पुस्तक प्रकाशित होत आहे, त्यापूर्वी त्यांच्या पुस्तकातील काही दाव्यांनी राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यावरून राजकारण तर तापलेच आहे. पण सत्ताधारी गोटातूनही जोरादार प्रतिक्रिया येत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List