साय-फाय – मायक्रोसॉफ्टचा पाकिस्तानला झटका
>> प्रसाद ताम्हनकर
जगप्रसिद्ध आयटी कंपनी मायक्रोसॉफ्ट लवकरच पाकिस्तानमधून आपला गाशा गुंडाळते आहे. मायक्रोसॉफ्टने नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून तब्बल 9 हजार कर्मचाऱयांना कमी करण्याचे धोरण आखलेले आहे. या धोरणाचा सगळ्यात मोठा फटका पाकिस्तानच्या कर्मचारी वर्गाला बसलेला आहे. 25 वर्षांपासून इथे कार्यरत असलेली मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानमध्ये असलेले आपले कार्यालयदेखील कायमसाठी बंद करत आहे. कंपनी बंद होत असली तरी पाकिस्तानी नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा आणि सेवा मात्र नेहमीप्रमाणे कार्यरत राहणार आहेत. अर्थात त्यासाठी मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानमध्ये असलेल्या त्यांच्या भागीदार कंपन्यांची मदत घेणार आहे.
मायक्रोसॉफ्टच्या या निर्णयावर पाकिस्तानमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. पाकिस्तानच्या तंत्रज्ञान मंत्रालयानुसार कंपनीचा हा निर्णय म्हणजे पाकिस्तानातून माघार घेणे नसून भविष्यातील भागीदारीवर आधारित व्यवसायाची वाढ करण्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल आहे. मायक्रोसॉफ्टच्या या निर्णयाचा पाकिस्तानी तंत्रज्ञान कंपन्यांना फायदा मिळणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. मायक्रोसॉफ्ट भविष्यातील तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर लक्ष केंद्रित करण्याच्या प्रयत्नात आहे व त्या दृष्टीने इतर गोष्टींवरचा खर्च कमी करून नवीन डाटा सेंटर आणि चिप्स बनवण्यावर कंपनी जास्त लक्ष देणार आहे.
पाकिस्तानी तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकाऱयांना मायक्रोसॉफ्टचा हा निर्णय पाकिस्तानसाठी फायदेशीर वाटत असला तरी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती अरिफ अल्वी यांनी मात्र हा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय पाकिस्तानच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. मागील सरकारच्या काळात मायक्रोसॉफ्ट कंपनी पाकिस्तानमध्ये अधिक गुंतवणूक करण्याचा विचार करत होती आणि आता अचानक असे काय घडले की कंपनीने देश सोडण्याचा निर्णय घेतला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
पाकिस्तानच्या नागरिकांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून या निर्णयावर टिपणी केल्या आहेत. मायक्रोसॉफ्टचा हा निर्णय चुकीचा असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे आणि भविष्यात मायक्रोसॉफ्टच्या सेवांमध्ये अडथळा आल्यास त्वरित मदत न मिळण्याची शंका व्यक्त केली आहे. दुसरीकडे काही पाकिस्तानी युजर्सनी मायक्रोसॉफ्टच्या या निर्णयावर शंका व्यक्त केली आहे आणि मायक्रोसॉफ्टच्या पूर्वी 2022 मध्ये उबरने आपली सेवा बंद करण्याचा घेतलेला निर्णय, तसेच 2015 साली सुरू झालेल्या राइड हेलिंग कंपनी करीमने या वर्षी आपली सेवा पाकिस्तानात बंद करण्याचा घेतलेला निर्णय याकडे लक्ष वेधले आहे.
या सर्व गोष्टींवर प्रतिक्रिया देताना मायक्रोसॉफ्टने आपण सध्या भविष्याकडे लक्ष देत आहोत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये गुंतवणूक वाढवणे हे आपले लक्ष असल्याचे स्पष्ट केले आहे. पुढचे युग आणि पिढी ही पूर्णपणे AI वर अवलंबून असेल आणि AI मुळे मानवांचे एकमेकांशी असलेले व्यवहार, वर्तणूक यावरदेखील मोठा परिणाम झालेला असेल असा अंदाज वर्तवला आहे. तसेच कंपनी फक्त पाकिस्तान नाही, तर जगभरातील अनेक कर्मचाऱयांना कामातून मुक्त करत आहे असे स्पष्ट केले. मायक्रोसॉफ्टचे जगभरात 2,28,000 कर्मचारी आहेत आणि त्यातील 4 टक्के कर्मचाऱयांवर या नोकर कपातीचा परिणाम होणार आहे. या वर्षातील मायक्रोसॉफ्टची ही तिसरी नोकर कपात आहे.
मायक्रोसॉफ्ट आपला पारंपरिक व्यवसाय बदलत आता पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांच्या या निर्णयावरून दिसत आहे. ChatGPT या सध्या जगभरात प्रचंड लोकप्रिय असलेल्या आणि सर्वाधिक वापर असलेल्या चाटबॉटमध्येदेखील मायक्रोसॉफ्टने मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे. या चाटबॉटची निर्माती असलेली ओपन एआय ही कंपनी आणि मायक्रोसॉफ्टचे संबंधदेखील सध्या ताणले गेल्याचे बोलले जात आहे. मायक्रोसॉफ्टने तयार केलेला को-पायलट हा चाटबॉट त्यामानाने फारसा लोकप्रिय ठरलेला नाही आणि इतर व्यावसायिक कंपन्या को-पायलटपेक्षा ChatGPT च्या वापराला जास्त प्राधान्य देत आहेत. दुसरीकडे मेटासारखी प्रतिस्पर्धी कंपनी सुपर इंटेलिजन्स लॅब तयार करण्याच्या तयारीत आहे. अशा स्पर्धेच्या काळात भविष्यातील तंत्रज्ञानात गुंतवणूक करणे मायक्रोसॉफ्टसाठी अनिवार्य असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करत आहेत.
[email protected]
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List