सोने-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ; टॅरिफच्या धास्तीने सोने झाले लाखमोलाचे
जागतिक अर्थव्यवस्था, शेअर बाजार याचा परिणाम सोन्याचांदीच्या दरावर होत असतो. आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्ररिफ बॉम्बने जगभरात अस्वस्थतेचे वातावरण आहे. त्यांच्या या निर्णयामुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार आता सोन्याचांदीच्या गुंतवणुकीकडे वळत आहे. त्यामुळे सोन्याचांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली असून सोन्याचे दर पुन्हा एकदा एक लाखांवर गेले आहेत.
वायदे बाजारात आणि सराफा बाजारात सोमवारी सोन्याचे दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 1 लाखांवर गेले आहेत. 24 कॅरेट सोन्याचे दर 548 रुपयांनी वाढून 1,03,754 रुपयांवर गेले आहेत. तर, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 91,690 रुपये, 18 कॅरेट सोन्याचे एका तोळ्याचे दर 75,020 रुपयांवर आहेत. चांदीचे एक किलोचे दर 1,16,142 रुपये झाले आहेत.
सोने कुटुंबाच्या आर्थिक संपन्नतेचं प्रतीक मानले जाते. सोन्यातून दर वेळी महागाईच्या तुलनेत चांगला परतावा मिळालेला आहे. त्यामुळं सोन्याची मागणी कायम असते. तसेच शेअर बाजार आणि जागतिक अस्वस्थतेमुळे गुंतवणूकदाराही सोन्यात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे दरात आणखी वाढ होत आहे. या वर्षी सोन्याचे दर 23051 रुपयांनी वाढले आहेत. तर चांदीचे दर 26743 रुपयांनी वाढले आहेत.
सध्या अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्टपासून विविध देशांवर टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी अमेरिका विविध देशांसोबत व्यापारी करार करत आहे. अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवार्ड लुटनिक यांनी म्हटलं की ते यूरोपियन यूनियन सोबतच्या व्यापारी कराराबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे याबाबतच्या निर्णयाकडे जगाचे आणि सराफा बाजाराचे लक्ष लागले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List