महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास तातडीने सुरू न झाल्यास, महाराष्ट्र बंद करू; जरांगे पाटील यांचा इशारा
परळीतील महादेव मुंडे यांच्या निर्घुण हत्या प्रकरणी माझ्या बहिणीने मला मदत मागितली. मी तिच्या मदतीसाठी धाऊन जात आहे. महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास तातडीने सुरू न झाल्यास, आरोपींना अटक न केल्यास आणि त्या माझ्या बहिणीला न्याय न मिळाल्यास महाराष्ट्र बंद करू, असा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी महादेव मुंडे यांच्या परिवाराला धीर देत मी तुमच्या पाठिशी आहे, तुम्हाला न्याय मिळवून देण्याचे काम ही माझी जबाबदारी असल्याचा शब्द दिला.
परळीतील महादेव मुंडे यांच्या निर्घुण हत्येच्या घटनेला दोन वर्षाचा कालावधी उलटत आहे. अद्यापही न्याय न मिळाल्याने संतप्त झालेल्या महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. आज अखेर मनोज जरांगे पाटील यांनी परळीत जाऊन महादेव मुंडे यांच्या परिवाराची भेट घेतली. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत.
आस्थेवाईकपणे चौकशी केली. झालेला अन्याय विषद करताना ज्ञानेश्वरी मुंडे धायमोकलून रडल्या. राजकारणामध्ये कोणताही संबंध नसलेल्या माझ्या पतीला केवळ एका प्लॉटसाठी मारण्यात आले. त्यांची निर्घुण हत्या करून हत्या झाली की नाही, पुरावा म्हणून नरड्याचे मास वाल्मीक कराड याला नेवून दाखवण्यात आले. या घटनेनंतर आम्ही अक्षरश: कोलमडून गेलो आहोत, आम्हाला न्याय मिळत नाही. पोलिसांचा तपास ठप्प आहे. सहा वेळा तपास बदलण्यात आला. तपासात कोणतीही प्रगती नाही. पोलिसांचे या प्रकरणात सीडीआर तपासले पाहिजेत, मीडियामध्ये बातम्या आल्या की तपास सुरू होतो, आणि बातम्या थांबल्या की तपास ठप्प होतो. तपास करा, कोण म्हणतंय तपास करा किंवा तपास थांबवा यासाठी कोणाचे आदेश येतात हे आम्हाला माहित नाही. पोलीस उपाधिक्षक पंकज कुमावत यांच्याकडे हा तपास देण्यात आला होता. मात्र त्यांना परळीत फिरकू दिले गेले नाही असा आरोपही ज्ञानेवरी मुंडे यांनी करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भेटण्यासाठी वेळ देत नाहीत अशी व्यथा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
जातीपातीच्या पलिकडे जाऊन माणूसकी आहे की, नाही असे म्हणत त्यांनी मी तुमचा भाऊ आहे, भाऊ म्हणून शेवटपर्यंत सोबत राहिल. या हत्येमध्ये कोणीही असो त्याला सुट्टी नाही. आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे ही माझी मागणी राहिल. तुमच्या न्याय हक्कासाठी, तुमच्या पाठिशी मी खंबीर उभा आहे. आरोपींना अटक न झाल्यास बीड जिल्ह्यामध्ये एकाही मंत्र्याला किंवा आमदारांना फिरू देणार नाही, तुम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही महाराष्ट्र बंद करू, मुख्यमंत्री तुम्हाला वेळ का देत नाहीत. हे त्यांना विचारून घेतो, असे म्हणत जरांगे पाटील यांनी त्या कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा तपासासाठी एसआयटी स्थापन केली. कुठं आहे ती एसआयटी असाही प्रश्न जरांगे पाटीलांनी उपस्थित केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List