डेंग्यू बरा झाल्यानंतरही शरीरावर करतो असा परिणाम; ही लक्षणे धोकादायक
पावसाळा म्हटलं की आजार हे आलेच त्यात पावसाळ्यात डासांमुळे होणार आजार तर जास्तच जोर धरतात. त्यातील एक आजार म्हणजे डेंग्यू. हा आजार विषाणूजन्य संसर्ग आहे जो एडीस डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. पाऊस आणि घाणेरड्या पाण्यात प्रजनन करणारे हे डास मानवांना संक्रमित करतात. पावसाळ्यात सगळ्यात जास्त या आजाराची लक्षणे दिसून येतात.
डेंग्यूची लक्षणे
उच्च ताप, डोकेदुखी, अंगदुखी, प्लेटलेट्सची कमतरता आणि अशक्तपणा ही डेंग्यूची सामान्य लक्षणे आहेत. या आजारात प्लेटलेट्स झपाट्यानं कमी होतात. गंभीर स्थितीत रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागते. मात्र योग्य उपचार घेतल्यानंतर रुग्ण बरा होतो, परंतु त्याचा परिणाम बराच काळ टिकतो. कधीकधी डेंग्यूपासून पूर्णपणे बरा होण्यासाठी महिने लागतात. पण हे फार कमी जणांना माहित असेल की डेंग्यू बरा झाल्यानंतर देखील त्याचा मानसिक आणि शरीरावर परिणाम होतो. पण तो कसा चला जाणून घेऊयात.
डेंग्यूनंतर रुग्णांमध्ये निर्माण होणाऱ्या समस्या
डेंग्यूनंतर रुग्णांमध्ये मानसिक समस्यांची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे सतत थकवा आणि उर्जेचा अभाव, ज्यामुळे व्यक्तीला त्याच्या छोट्या छोट्या कामातही रस कमी वाटू लागतो. काही लोकांना निद्रानाश किंवा वारंवार झोपेत अडथळा येण्याची समस्या असते. डेंग्यूनंतर मानसिक अस्वस्थता, ताण आणि चिंताग्रस्तता यासारखी लक्षणे देखील दिसून येतात.
मानसिक उपचारांची देखील आवश्यकता भासते
अनेक रुग्णांना लक्ष केंद्रित करण्यास त्रास होतो, ज्यामुळे अभ्यास किंवा कामावर परिणाम होतो. याशिवाय चिडचिड, दुःख आणि नैराश्य यासारखी लक्षणे देखील दिसून आली आहेत. दीर्घकालीन वेदना आणि शरीरातील कमकुवतपणा मानसिक स्थिती बिघडवते. जेव्हा अशी लक्षणे दिसतात तेव्हा रुग्णाला केवळ शारीरिकच नाही तर मानसिक उपचारांची देखील आवश्यकता भासते.
डेंग्यूनंतर मानसिक आजार होण्याची कारणे
आरएमएल रुग्णालयातील औषध विभागाचे डॉ. सुभाष गिरी स्पष्ट करतात की डेंग्यूनंतर मानसिक आजार अनेक कारणांमुळे होऊ शकतात. सर्वप्रथम हा आजार शरीराला दीर्घकाळ कमकुवत करतो. सतत थकवा आणि वेदनांचा रुग्णाच्या मनावर वाईट परिणाम होतो. दुसरे कारण म्हणजे रुग्णालयात दाखल होण्याचा अनुभव, जिथे रुग्ण अनेकदा भीती, चिंता आणि तणावातून जातो. बऱ्याचदा प्लेटलेट्स कमी होण्याचा किंवा आयसीयूमध्ये दाखल होण्याचा अनुभव मनावर खोलवर परिणाम करतो. याशिवाय, डेंग्यू दरम्यान शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीचा असंतुलित प्रतिसाद मानसिक आरोग्यावर देखील परिणाम करतो.
आयसीयूची बसलेली भीती
डेंग्यू झाल्यानंतर काही रुग्णांना मानसिक समस्यांचा धोका जास्त वाढतो. जसे की ज्यांचा डेंग्यू लवकर बरा होण्याच्या परिस्थितीत नसेल तेव्हा अशा रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागते. त्यानंतर रुग्ण बरा झाल्यानंतर देखील रुग्णाच्या मनातून ती भीती लवकर जात नाही. त्यामुळे त्याचा शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.
डेंग्यूतून बरे झाल्यानंतर स्वतःला या विचारांमधून कसे बाहेर काढावे?
डेंग्यूतून बरे झाल्यानंतर, वेळोवेळी डॉक्टरांकडून फॉलो-अप घ्या.
चांगली झोप घ्या आणि भरपूर विश्रांती घ्या.
योगासने, ध्यान करा तसेच हलका व्यायाम करा जेणेकरून मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल
कुटुंब आणि मित्रांशी बोला, एकटेपणा टाळा
जर तुम्हाला दीर्घकाळापर्यंत ताण किंवा नैराश्याची लक्षणे जाणवत असतील तर मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List