ठाण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर कडक ‘वॉच’; ८ हजार पोलीस, ८०० होमगार्ड, १०२ ड्रोनचा भिरभिरता पहारा
गेले दहा दिवस भक्तांनी केलेली मनोभावे पूजाअर्चा स्वीकारून आणि भजन, नाचगाण्यांची मैफल, स्पर्धा तसेच मोदकासह मिष्ठान्नांचा लाभ घेऊन गणपती बाप्पा उद्या शनिवारी गावाला निघणार आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी घरच्या मंडळींनी आणि सार्वजानिक गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरळीत व्हावी यासाठी खाकी वर्दी अलर्ट असून ठाण्यात आठ हजार पोलीस डोळ्यात तेल घालून पहारा देणार आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत ११ पोलीस उपायुक्त, २६ सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ८०० होमगार्ड, ६५ महाराष्ट्र पोलीस दल, १० पोलीस निरीक्षक तसेच गुन्हे शाखेचे पथक ४८ तास तैनात असून विसर्जन मिरवणुकीवर १०२ ड्रोनची भिरभिरती नजरही असणार आहे.
विसर्जन घाट सज्ज
सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात केले जाणार असल्याने ठाणे महापालिकेने कृत्रिम तलाव, आहे. तसेच या संपूर्ण व्यवस्थेची माहिती देण्यासाठी हरित विसर्जन अॅप तयार केला आहे. यावर्षी २४ कृत्रिम तलाव, ७४ टाकी विसर्जन, १५ फिरते विसर्जन, नऊ घाटांवर विसर्जन आणि १० मूर्ती स्वीकृती केंद्र अशा एकूण १३२ ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे.
अवजड वाहनांना शहरात बंदी
बाप्पाला निरोप देण्यासाठी ठाणे वाहतूक पोलीसदेखील सज्ज झाले आहेत. विसर्जनात कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी वाहतुकीमध्ये बदल केले आहेत. ठाणे शहरात जड-अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. वाहतुकीच्या नियोजनाकरिता मनुष्यबळ वाढवण्यात आले असून रविवारी पहाटेपर्यंत वाहतूक पोलीस ड्युटीवर असणार आहेत. आज सकाळपासूनच विसर्जन मार्गावर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List