‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा तुम्ही गरजेपेक्षा खाताय जास्त मीठ, ताबोडतोब प्रमाण करा कमी
मीठ हा आपल्या जेवणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. जेवणाची चव वाढवण्यासाठी पदार्थांमध्ये योग्य प्रमाणात मीठ टाकणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी मर्यादित प्रमाणात मीठ खाणे आवश्यक आहे. जर तुमच्या आहारात मीठाचे प्रमाण जास्त होत असाल तर हळूहळू ही सवय तुमच्या शरीराला नुकसान पोहोचवू शकते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, प्रौढ व्यक्तीने दररोज 5 ग्रॅम म्हणजेच 1 चमचे पेक्षा कमी मीठाचे सेवन केले पाहिजे, परंतु आजकाल प्रक्रिया केलेले अन्न आणि फास्ट फूडमुळे बहुतेक लोकं प्रमाणापेक्षा जास्त मीठ सेवन करत आहेत. जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ सेवन केले तर शरीर तुम्हाला काही लक्षणांद्वारे सावध करण्याचा प्रयत्न करते. या लक्षणांकडे लक्ष देऊन तुम्ही ही सवय सुधारू शकता. चला जाणून घेऊया ती लक्षणे कोणती आहेत.
पायांना सूज येणे
जर तुमचे पाय, घोटे किंवा हात वारंवार सुजत असतील तर ते जास्त मीठ खाल्ल्याचे लक्षण असू शकते. मिठामध्ये असलेले सोडियम शरीरात पाण्याचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे एडेमा म्हणजेच सूज येऊ शकते. जर तुम्हाला कोणत्याही दुखापती किंवा आजाराशिवाय सतत सूज येत असेल तर तुमच्या आहारात मीठाचे प्रमाण कमी करा.
जास्त तहान लागणे
जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. यामुळे शरीराला जास्त पाण्याची आवश्यकता असते आणि तुम्हाला वारंवार तहान लागते . जर तुम्ही नेहमीपेक्षा जास्त पाणी पीत असाल तर तुमच्या जेवणात मीठाचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे.
उच्च रक्तदाब
जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो, कारण सोडियम रक्तवाहिन्यांमध्ये पाणी साचून राहून त्यावर दबाव वाढवते. दीर्घकाळापर्यंत उच्च रक्तदाबामुळे हृदयरोग, किडनीचे नुकसान आणि स्ट्रोक होऊ शकतो. जर तुमचा रक्तदाब अचानक वाढत असेल तर तुमच्या आहारात मीठाचे प्रमाण नियंत्रित करा.
वजन वाढणे
तुम्ही तुमच्या आहारात किंवा व्यायामात कोणताही बदल केला नसला तरीही तुमचे वजन अचानक वाढत आहे का? हे जास्त मीठ खाल्ल्यामुळे असू शकते. मीठ शरीरात पाण्याचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे वजन वाढू शकते. जर तुम्ही कमी मीठ खाल्ले तर शरीरातून जास्त पाणी काढून टाकले जाते आणि तुमचे वजन कमी होऊ शकते.
पोट फुगणे
तुम्हाला जर अनेकदा जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखे किंवा जड वाटत असेल तर ते जास्त मीठ खाल्ल्यामुळे असू शकते. मीठ शरीरात पाणी साचून पोट फुगणे आणि गॅसची समस्या निर्माण करू शकते. हे टाळण्यासाठी प्रक्रिया केलेले अन्न, चिप्स, लोणचे आणि पॅक केलेले सूप यासारख्या पदार्थांचे सेवन टाळा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List