महावितरण कुणाला वाचवतेय का? निवळीतील दुर्घटनेला आठवडा झाला तरी चौकशी अहवालाची प्रतीक्षा
महायुती सरकारच्या काळात गरीबाला वाली नाही, अशी अवस्था आहे. रत्नागिरी तालुक्यात निवळी येथे खाली पडलेल्या विद्युत भारीत तारेला स्पर्श होऊन दोघांचा बळी गेला होता. या घटनेला आठवडा होत आला तरी अजून चौकशी अहवाल तयार झालेला नाही. गोरगरीबाचा जीव गेल्यानंतर महावितरण कुणाला वाचवायचा प्रयत्न करतेय? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
निवळी येथे 17 जुलै रोजी साफसफाई करायला गेलेल्या दोघांचा खाली पडलेल्या विद्युत भारीत तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला. निवळी येथे ही दुर्घटना घडली होती. चंद्रकांत तांबे आणि विद्युलता वासुदेव वाडकर हे साफसफाईसाठी गेले होते. त्या परिसरात एक विद्युत भारीत तार पडली होती. मात्र ती तार त्यांना दिसली नाही. तारेला नकळत स्पर्श होऊन त्या दोघांचा मृत्यू झाला. महावितरणच्या हलगर्जीपणाचे हे दोन बळी गेल्यानंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.
त्या दोघांना साफसफाई करायला कुणी पाठवले? पडलेली तार विद्युत भारीत आहे, याची शहानिशा महावितरणने का केली नाही? ही दुर्घटना घडल्यानंतर महावितरणचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी का पोहोचले नाहीत असे अनेक प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत. दोन निष्पाप व्यक्तींचा महावितरणच्या हलगर्जीपणामुळे बळी गेला असून महावितरण अद्याप या दुर्घटनेला दोषी कोण आहे हे सापडलेले नाही. दुर्घटना घडून आठवडा होत आला तरी चौकशी अहवाल तयार झालेला नाही. दोषींवर कारवाई तर दूरच राहिली आहे.महावितरण कुणाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
निवळी येथे दुर्घटना घडल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना महावितरणने वीस हजारांची तुटपुंजी मदत केली आहे. प्रत्यक्षात दोषी व्यक्तींवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. तसे मृतांच्या नातेवाईकांना योग्य ती नुकसानभरपाई मिळायला पाहिजे, अशी मागणी होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List