पंढरपूर कॉरिडॉर लपूनछपून करणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट
कॉरिडॉरबाबत सर्वांना विश्वासात घेतले जाणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी संभाव्य बाधितांशी चर्चा केली आहे, प्रश्नावली दिली आहे, माहिती घेतली आहे, काहीही लपूनछपून करणार नाही. जे काम सुरू आहे ते उघड सुरू आहे. पंढरपूर विकास आराखडा चोरी नाही. सर्वांना बरोबर घेऊनच विठुरायाच्या मंदिराचा व परिसराचा विकास करणे हेच ध्येय असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ठ केले.
संत नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरातच पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. एकीकडे प्रशासकीय पातळीवर पंढरपूर कॉरिडॉर बाबत वेगाने काम सुरू असताना स्थानिकांचा विरोध कायम आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न केला असता त्यांनी, कोणाचाही विनाश करून विकास करायचा नाही, हे आपले धोरण कायम असल्याचे सांगितले. कॉरिडॉरमध्ये घर, दुकान बाधित होणार असतील तर त्यांना अतिशय चांगल्या पध्दतीने समाविष्ठ करून घेतले जाणार आहे. कोणाचेही नुकसान होणार नाही अशी ग्वाही दिली. परंतु तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे कोट्यवधी भाविक येतात. त्यांची गैरसोय होणे बरोबर नाही. कॉरिडॉर संबंधी आम्ही जनतेत जाऊ तेव्हां आम्हाला मोठा पाठींबा मिळेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
संभाव्य कॉरिडॉर बाधितांनी शासनाकडून आराखड्या विषयी माहिती लपविण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. यावर फडणवीस यांनी आराखडा पूर्ण झाला की तो सर्वांना सादर केला जाणार असल्याचे सांगितले. तसेच कोणतेही काम लपूनछपून सुरू नसून उघड सुरु आहे. पंढरपूर शहर विकास आराखडा चोरी नाही असे सांगितले. तसेच आराखडा विरोधी तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार का या प्रश्नाव जे खरेच बाधित आहेत त्यांना भेटेन, पुढाऱ्यांना भेटणार नाही असे उत्तर दिले.
दरम्यान पंढरपूर कॉरिडॉर बाबत सुरवातीपासूनच मुख्यमंत्री फडणवीस सर्वांना विश्वासात घेणार असल्याचे सांगत होते. पंधरा दिवसा पूर्वी आषाढी एकादशीला आल्यावर देखील त्यांनी विश्वासात घेणार असल्याचेच स्पष्ठ केले. मात्र यास संभाव्या बाधितांकडून विरोध सुरू असल्याने त्यांनी विकास आराखडा चोरी आहे का असा प्रश्न करून आपले सूर बदलले असल्याची जाणीव करून दिली. तसेच या प्रश्नावर आम्ही जनतेमध्ये जाणार असल्याचे वक्तव्य केले. यावरून ठराविक लोकांचा विरोध असला तरी इतर नागरिकांचा पाठींबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे कॉरिडॉर मुद्द्यावर स्थानिक व शासन यांचा संघर्ष चिघळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List