पंढरपूर कॉरिडॉर लपूनछपून करणार नाही! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कॉरिडॉरबाबत सर्वांना विश्वासात घेतले जाणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी संभाव्य बाधितांशी चर्चा केली आहे. प्रश्नावली दिली आहे, माहिती घेतली आहे, काहीही लपूनछपून नाही. जे काम सुरू आहे ते उघड आहे. कारण पंढरपूर विकास आराखडा चोरी नाही. सर्वांना बरोबर घेऊनच विठुरायाच्या मंदिराचा व परिसराचा विकास करणे हेच ध्येय असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
संत नामदेव महाराज यांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आले होते. श्री संत नामदेव महाराजांच्या पायरीचे विधिवत पूजन करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. तसेच श्री संत चोखामेळा समाधीचे व श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचेही दर्शन मुख्यमंत्री यांनी घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, अभिजित पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सीईओ कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, आचार्य तुषार भोसले, संत नामदेव महाराज यांचे वंशज महेश ढवळे आदी उपस्थित होते.
एकीकडे प्रशासकीय पातळीवर पंढरपूर कॉरिडॉरबाबत वेगाने काम सुरू असताना स्थानिकांचा विरोध कायम आहे. यावर मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला असता त्यांनी, कोणाचाही विनाश करून विकास करायचा नाही हे आपले धोरण कायम असल्याचे उत्तर दिले. कॉरिडॉरमध्ये घर, दुकान बाधित होणार असतील तर त्यांना चांगल्या पद्धतीने समाविष्ट करून घेतले जाणार आहे. कोणाचेही नुकसान होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे कोटय़वधी भाविक येतात. त्यांची गैरसोय होणे बरोबर नाही. कॉरिडॉरसंबंधी आम्ही जनतेमध्ये जाऊ तेव्हा आम्हाला मोठा पाठिंबा मिळेल, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
संभाव्य कॉरिडॉरबाधितांनी शासनाकडून आराखडय़ाविषयी माहिती लपविण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. यावर फडणवीस यांनी आराखडा पूर्ण झाला की तो सर्वांना सादर केला जाणार असल्याचे उत्तर दिले. तसेच कोणतेही काम लपूनछपून सुरू नसून उघड सुरू आहे. पंढरपूर शहर विकास आराखडा चोरी नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच आराखडा विरोधी तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार का, या प्रश्नावर, ‘जे खरेच बाधित आहेत त्यांना भेटेन, पुढाऱ्यांना भेटणार नाही,’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
आषाढीला आल्यावर मुख्यमंत्र्यांनी सर्वांना विश्वासात घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, यास बाधितांचा विरोध असल्याने त्यांनी आज विकास आराखडा चोरी आहे का, असा प्रश्न करून आम्ही जनतेमध्ये जाणार असल्याचे वक्तव्य केले. यावरून ठरावीक लोकांचा विरोध असला तरी इतर नागरिकांचा पाठिंबा असल्याचे अप्रत्यक्षरीत्या सांगितले आहे. कॉरिडॉरमुळे स्थानिक व शासन यांचा संघर्ष चिघळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
संकुचित वृत्ती नको
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे कौतुक केले होते. यावर पत्रकारांनी पुन्हा राज्यात नवीन घडामोडी येणार काय, असा प्रश्न करताच फडणवीस यांनी, ‘आम्ही एकमेकांचे वैचारिक विरोधक असून, शत्रू नाहीत. यामुळे वाढदिवशी त्यांनी चांगल्या भावना व्यक्त केल्यावर याबाबत अन्य अर्थ काढणे चुकीचे आहे,’ असे ते म्हणाले.
व्हीआर दर्शन सुविधेचा शुभारंभ
श्री विठ्ठलाची महापूजा आणि विविध रूपे सर्वसामान्य भाविकांना पाहता यावीत यासाठी श्री विठ्ठल मंदिरात व्हीआर दर्शन सुविधेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. गॉगलद्वारे देवाची विविध रूपे आता देशभरातील भाविकांना पाहायला मिळणार आहेत. यापूर्वी उज्जैन आणि काशी विश्वेश्वर या देशातल्या दोन ठिकाणी अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List