तुम्ही शिकलेल्या आहात, कमावून खा! पत्नीने मागितली 12 कोटींची पोटगी, सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला
18 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या महिलेने पतीकडून मुंबईत घर आणि 12 कोटी रुपयांची पोटगी मागितल्याचे प्रकरण चर्चेत आहे. महिलेची मागणी ऐकून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठही आश्चर्यचकित झाले. त्यावर सुनावणी करताना, तुम्ही इतक्या शिकलेल्या आहात. स्वतः कमावून खाल्ले पाहिजे, असे म्हणत कोर्टाने प्रकरणाचा निकाल राखून ठेवला.
लग्नाला दीड वर्षे झाल्यानंतर पतीने विवाह रद्दबातल घोषित करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. पत्नी स्किझोफ्रेनियाने ग्रस्त असल्याचे पतीने म्हटले होते. त्यावरून पत्नीने पतीकडे पोटगी मागितली होती. पोटगीवरून दोघांमध्ये कायदेशीर लढाई सुरू झाली. एमबीए पदवीधारक आणि आयटी व्यावसायिक असलेल्या पत्नीने पोटगीच्या मोठय़ा दाव्यासह सुप्रीम कोर्टात धाव घेतली. कोर्टाने लग्नाच्या 18 महिन्यांनंतर घर आणि 12 कोटी रुपयांची पोटगी मागण्याच्या मागणीवर आक्षेप घेतला. ‘एकतर फ्लॅट मिळेल किंवा चार कोटी रुपये घ्या आणि चांगली नोकरी शोधा,’ असे म्हणत कोर्टाने निर्णय राखून ठेवला.
पत्नीची मागणी
पत्नीने मुंबईतील फ्लॅट मागताना दावा केला की, , तिचा पती खूप श्रीमंत आहे. तसेच पत्नीने कोर्टालाच, माय लॉर्ड, मी स्किझोफ्रेनियाग्रस्त दिसते का असंही विचारलं होतं.
काय म्हणाले न्यायालय?
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठाने पत्नीची शैक्षणिक पातळी आणि लग्नाच्या कालावधीनुसार तिच्या दाव्यांबाबत माहिती घेतली. ‘तू आयटी क्षेत्रातली आहेस, तू एमबीए केले आहेस, तुम्हाला बंगळुरू, हैदराबाद येथे खूप मागणी आहे. तू काम का करत नाहीस?’ असा सवाल कोर्टाने केला. तसेच ‘तुमचं लग्न फक्त 18 महिने टिकलं. आता तुम्हाला बीएमडब्ल्यू हवी आहे आणि पोटगी म्हणून प्रत्येक महिन्यासाठी 1 कोटी रुपये हवेत? तुम्ही इतके शिक्षित असताना स्वतःच्या मर्जीने काम करत नाही. तू काहीही मागितले नाही पाहिजे आणि स्वतः कमावून खाल्ले पाहिजे,’ असेही कोर्टाने म्हटले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List