दहावीची परीक्षा फी दीड हजार; उकळले साडेतीन हजार, सानपाड्यातील रायन शाळेचा कारनामा
दहावीच्या परीक्षेची फी नियमानुसार दीड हजार रुपये असली तरी सानपाडा येथील रायन शाळेच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांकडून 3 हजार 700 रुपये उकळले आहेत. या शुल्काची कोणतीही पावती शाळा व्यवस्थापनाने दिली नाही. त्यामुळे एका पालकाने अधिक चौकशी केली असता शाळेचा हा गैरव्यवहार चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी पालकाने सानपाडा पोलीस ठाण्यात शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात तक्रार केली आहे.
सानपाडा येथील सेक्टर 10 मधील रहिवासी रमेश घेघडमल यांची मुलगी रायन शाळेत शिक्षण घेत होती. तिने फेब्रुवारी 2025 मध्ये दहावीची परीक्षा दिली. या परीक्षेसाठी बोर्ड नियमानुसार खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून एक हजार 500 रुपये फी घेते. अतिरिक्त विषय असल्यास 300 रुपये जास्त भारावे लागतात. हिच फी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक हजार 200 रुपये आहे. मात्र रायन शाळेच्या व्यवस्थापनाने सर्वच विद्यार्थ्यांकडून सरसकट 3 हजार 400 रुपये घेतले. ज्या विद्यार्थ्यांनी सहा विषय घेतले होते, त्यांच्याकडून आणखी 300 रुपये उकळले. या शाळेतून सुमारे 600 विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षा दिली असून त्यांच्याकडून ही वाढीव फी उकळण्यात आली आहे, असे रमेश घेघडमल यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
पैसे रोख घेतले
परीक्षेची फी विद्यार्थ्यांनी फक्त रोख स्वरूपात भारावी, अशा सूचना वर्ग शिक्षकांनी सर्वच विद्यार्थ्यांना दिल्या होत्या. या फीची पावती मागितली असता शाळा प्रशासनाने ती देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर हा झोल उघडकीस आला. याप्रकरणी शिक्षण विभागाकडेही तक्रार करण्यात आली आहे, अशी माहिती रमेश घेघडमल यांनी दिली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List