दौंडमध्ये आमदार शंकर मांडेकरांच्या भावाचा कला केंद्रात गोळीबार, 36 तासांनंतर चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल

दौंडमध्ये आमदार शंकर मांडेकरांच्या भावाचा कला केंद्रात गोळीबार, 36 तासांनंतर चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल

राज्यातील सत्ताधारी महायुतीतील आमदार-मंत्र्यांचे रोज एक प्रकरण उघडकीस येत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदर शंकर मांडेकर यांच्या भावाने सोमवारी रात्री दौंडनजीक न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार केला. धक्कादायक म्हणजे, हे प्रकरण दाबण्यासाठी यवत पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. अखेर मीडियात बातमी आल्यानंतर तब्बल 36 तासांनंतर चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, राज्यात काय सुरू आहे? हा कसला सत्तेचा तमाशा? असे सवाल जनता विचारत आहे.

बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि एक अनोळखी अशा चौघांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांनी फिर्याद दाखल केली आहे. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाखारी (ता. दौंड) परिसरात न्यू अंबिका कला केंद्र असून, त्या ठिकाणी 21 जुलैला रात्री साडेसातच्या सुमारास आरोपी मांडेकर, जगताप, मारणे गाण्याची बारी पाहण्यासाठी बसले होते. त्यावेळी रात्री साडेअकराच्या सुमारास काही कारणांवरून वाद झाला. त्याच रागातून चौघेही आरोपी कला केंद्रातून बाहेर आल्यानंतर एकाने हवेत गोळीबार केला. त्यानंतर ते घटनास्थळाहून निघून गेले होते. गोळीबारात कोणीही जखमी झाले नसून, याप्रकरणी आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा माग काढला जात आहे. घटनास्थळी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, स्थानिक अन्वेषण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांग यांनी धाव घेतली.

आरोपी भावासह आमदार मांडेकर एसपी कार्यालयात
गोळीबाराची घटना लपवण्यासाठी भोर-वेल्हा-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर आणि बाळासाहेब मांडेकर हे 22 जुलैला पोलीस अधीक्षक कार्यालयात ठाण मांडून बसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदारासह आरोपीने पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांची भेट घेतली. त्यानंतर गुन्हा दाखल न करण्यासाठी विनवणी केली होती. मात्र, सोशल मीडियासह प्रसारमाध्यमांत घटनेची माहिती व्हायरल झाली. त्यानंतर मात्र बाळासाहेब मांडेकरसह इतरांविरुद्ध पोलिसांना गुन्हा दाखल करण्याशिवाय पर्याय उरला नाही.

पोलिसांनी 36 तास प्रकरण दाबले
गोळीबाराची घटना 21 जुलैला रात्री साडेअकराच्या सुमारास घडली होती. त्यानंतर तब्बल 36 तास हे प्रकरण दाबण्यात आले. त्यासाठी स्थानिक पोलिसांसह एका बडय़ा अधिकाऱ्याने दबाव टाकल्याचीही चर्चा आहे. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या न्यू अंबिका कला केंद्रात मध्यरात्रीनंतरही लावणी सुरू असते. त्यासाठी संबंधित वरिष्ठांना आर्थिक हातभार लावला जात आहे. त्यामुळेच घटना घडूनही माहिती असतानाही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कला केंद्राकडून नेमकी आर्थिक रसद कोणाकोणाला पुरविली जाते, त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

गोळीबारात नृत्यांगना जखमी ?
गोळीबारात नृत्यांगना जखमी झाल्याची माहिती आहे. या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार करून तिला सोडून दिल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांनी या गोळीबाराच्या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान, यापूर्वीही त्या ठिकाणी गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे संबंधित कला केंद्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. न्यू अंबिका कला केंद्र हे अशोक जाधव यांच्या मालकीचे आहे.

पोलीस प्रकरण दाबत आहेत – रोहित पवार
आमदार रोहित पवार यांनी कला केंद्रामधील गोळीबाराच्या घटनेचा भंडाफोड केला. गुन्हा दाखल होण्यापूर्वी पुण्यात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘आमदाराच्या बंधूने त्या ठिकाणी गोळीबार केला. त्यात एका महिला जखमी झाली आहे. पोलीस जर माहिती दाबण्याचा प्रयत्न करत असतील, तर योग्य ठरणार नाही. पोलीस अधिकारी माहिती लपवत आहेत म्हणून कारवाई करावी लागेल. खरी माहिती लोकांसमोर आली पाहिजे. सत्तेतील लोकांचा दबाव आहे. हा कसला सत्तेचा तमाशा? जखमी महिलेवरही दबाव आहे,’ अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

रोहित पवार म्हणाले, ‘गोळीबार करणारी व्यक्ती एका सत्ताधारी आमदाराचा भाऊ असल्याने असल्याने हे प्रकरण झाकले जात असल्याचा आरोपही होऊ लागला आहे. 24 तास उलटूनही पोलिसांना या प्रकरणाची काहीच माहिती मिळाली नाही. कला केंद्राच्या मालकांना विचारले असता, त्यांनी गोळीबार झाला नसल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी केली. त्यानंतर पोलीस तपासाची चक्र फिरली आणि हा गोळीबाराचा प्रकार समोर आला.’

आमदार मांडेकर म्हणाले, घटनेची माहिती नाही!
गोळीबार प्रकरण 36 तासांनंतर उघडकीस आले. त्यावर आज सायंकाळी आमदार शंकर मांडेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘घटनेची माहिती मला नाही. पोलिसांनी रीतसर कारवाई करावी,’ असे त्यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पंढरपूर कॉरिडॉर लपूनछपून करणार नाही! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर कॉरिडॉर लपूनछपून करणार नाही! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कॉरिडॉरबाबत सर्वांना विश्वासात घेतले जाणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी संभाव्य बाधितांशी चर्चा केली आहे. प्रश्नावली दिली आहे, माहिती घेतली आहे, काहीही...
महू धरणाच्या भिंतीवर काटेरी जंगलाचा विळखा, 30 वर्षांपासून धरणाचे काम प्रलंबित
श्रीगोंद्यातील जवानाचा मृतदेह कोलकात्यात रेल्वेमार्गाशेजारी आढळला
कोल्हापूर महापालिकेत ठेकेदाराचा घोटाळा; तत्कालीन शहर, उप आणि कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस
गुजरातच्या धर्तीवर माथेरानमधील हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन करा! 2 आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
दीड लाख गोविंदांना विमा कवच मिळणार
तुम्ही शिकलेल्या आहात, कमावून खा! पत्नीने मागितली 12 कोटींची पोटगी, सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला