एकतर्फी प्रेमातून विकृताचे भयंकर कृत्य; महिलेच्या पतीची हत्या करून मृतदेह चिखलात गाडला, वाशी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या अवळल्या
एकतफीं प्रेमातून विकृताने भयंकर कृत्य केल्याची घटना वाशी येथील महिलेने लग्नाला नकार दिल्यामुळे झोपडपट्टीत घडली आहे. विवाहित या विकृताने तिच्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह खाडीत गाडला. याप्रकरणी वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीवर झडप घातली असून त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.
वाशीमधील झोपडपट्टीत राहणाऱ्या अमिनूर अली अहमदअली मोल्ला (21) याचे याच परिसरात राहणाऱ्या एका 25 वर्षीय विवाहित महिलेवर एकतर्फी प्रेम होते. मात्र ही महिला त्याच्या प्रेमाला कोणताही प्रतिसाद देत नव्हती. तरीही त्याने तिच्या मागे लग्नासाठी तगादा लावला. हा प्रकार महिलेचा पती अबुबकर सुहादअली मंडल याला समजल्यानंतर त्याने अमिनूरला समज दिली. मात्र त्यानंतरही अमिनूरने या महिलेच्या मागे लग्नाचा तगादा कायम ठेवला. तिचा नकार कायम असल्यामुळे विकृत अमिनूरने तिचा पती अबुबकार याची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने त्याचा मृतदेह वाशी खाडीत पुरला. त्याच्या जवळ असलेल्या वस्तू खाडीत फेकून दिल्या.
अबुबकर घरी न आल्यामुळे त्याच्या पत्नीने वाशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अमिनूर याने आपल्या पतीचा घातपात केला असल्याचा संशय तिने व्यक्त केला. त्यानुसार पोलीस कामाला लागले. त्यांनी अमिनूरची उचलबांगडी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अबुबकरचा खाडीत गाडलेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List