तुम्ही आपटून आपटून कुणाला आणि कसे मारणार? मराठी खासदारांनी निशिकांत दुबेंना संसदेत घेरलं; टप्प्यात येताच कार्यक्रम
महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादामध्ये झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी विनाकारण उडी घेत मराठी माणसाला पटकून… पटकून.. मारण्याची भाषा वापरली होती. निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल अत्यंत घाणेरडे शब्द वापरले होते. ‘महाराष्ट्रात एकही उद्योग नाही. मराठी माणूस दुबे आणि चौबेच्या पैशांवर जगतोय, असे तारे निशिकांत दुबे यांनी तोडले होते. यामुळे त्यांच्यावर चौफेर टीकाही झाली होती. आता ‘मऱ्हाठी माणसाला’ नडणाऱ्या याच दुबेंना बुधवारी महाराष्ट्रातील मराठी खासदारांनी संसदेत घेरले.
महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल आकस बाळगणाऱ्या निशिकांत दुबे यांना महाराष्ट्रातील मराठी खासदारांनी चांगलाच धडा शिकवला. बुधवारी संसदेचे कामकाज संपल्यानंतर महिला खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव आणि प्रतिभा धानोरकर या निशिकांत दुबे यांना शोधत होत्या. निशिकांत दुबे लॉबीमध्ये येताच महिला खासदारांनी त्यांना घेराव घालत जाब विचारला.
मराठीद्वेष्ट्या निशिकांत दुबेंचा मुंबईत आलिशान फ्लॅट! उमेदीच्या काळात मुंबईनेच तारले
मराठी माणसाला मारण्याची भाषा तुम्ही कशी करू शकता? तुम्ही आपटून, आपटून कुणाला आणि कसे मारणार? कसली ही तुमची भाषा? असा सवालांची सरबत्ती वर्षा गायकवाड यांनी निशिकांत दुबे यांच्यावर केली. तसेच तुमचे हे वागणे योग्य नाही. मराठी भाषिक आणि मराठी माणसाविरोधातली तुमची अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही, असा सज्जड दमही खासदारांनी देत ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणाबाजीही केली. मराठी खासदारांचा हा रुद्रावतार पाहून निशिकांत दुबे यांनी आप तो मेरी बहन हो… असे म्हणत तिथून काढता पाय घेतला. ‘एबीपी माझा’ने याबाबत वृत्त दिले आहे.
लॉबीमध्ये घडलेल्या या घटनेची संसद भवन परिसरामध्ये चर्चा होती. हा प्रकार घडल्यानंतर निशिकांत दुबे काही वेळाने कँटिनकडे रवाना झाले. यावेळी त्यांना केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी हटकले आणि नक्की काय घडले अशी विचारणा केली. मात्र त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.
दरम्यान, याच संदर्भात वर्षा गायकवाड यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी नेमके काय घडले हे सांगितले. आपण भाजप खासदार निशिकांत दुबे यांना त्यांच्या विधानाबाबत जाब विचारल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ‘जय महाराष्ट्र ‘अशी घोषणाही दिली. त्यानंतर दुबे हात जोडून तिथून निघून गेले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List