शहापुरात ‘चिखल’ पूर, गर्भवतीची झोळीतून एक किलोमीटर फरफट
आदिवासीबहुल शहापूर तालुक्यातील गर्भवती महिलेला चिखलवाट तुडवत ‘झोळी प्रवास’ करावा लागला. भवरपाडा ते मुख्य रस्त्यापर्यंतच्या पारधीपाड्यापर्यंत एक किलोमीटर फरफट करण्याची वेळ आदिवासी महिलेवर आली. मनीषा भवर असे तिचे नाव असून शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात तिची प्रसूती सुखरूप पार पडली. डोंगर-दऱ्यांतील शहापुरात महिनाभरामध्ये घडलेली ही तिसरी घटना असून शहापूरचे ‘चिखल’ पूर झाले आहे.
चाफेवाडी, फुगाळे ग्रामपंचायतीमधील वरसवाडी येथील महिला रुग्णांना रस्त्याअभावी झोळीतून प्रवास करावा लागल्याच्या घटना महिनाभरात घडल्या आहेत. डोंगर-दऱ्यांमध्ये वसलेल्या भवरपाडा येथील मनीषा भवर या गर्भवती महिलेला मंगळवारी दुपारी पोटात कळा येऊ लागल्याने नातेवाईकांची मोठी धावपळ उडाली. धो धो कोसळणारा पाऊस आणि नेटवर्क अभावी संपर्क नसल्यामुळे नातेवाईक व ग्रामस्थांना काही सुचेना.
भवरपाडा येथून मुख्य रस्त्यापर्यंत किमान एक किमीचा रस्ता नसल्याने मनीषा भवर या गर्भवती महिलेला झोळीतून चिखलाच्या पायवाटेने प्रवास करावा लागला.
नातेवाईकांनी झोळी करून मनीषाला मुख्य रस्त्यालगत असलेल्या पारधीपाड्यापर्यंत आणले. नेटवर्कची समस्या असल्याने रुग्णवाहिकादेखील उपलब्ध करता आली नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List