सिस्टिम शेतकऱ्यांचा जीव घेतेय अन् सरकार श्रीमंतांना कर्जमाफी देतेय! महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात अवघ्या 3 महिन्यामध्ये 767 शेतककऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त होत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याच पीआरचा तमाशा पाहण्यात व्यस्त आहेत. सिस्टिम शेतकऱ्यांची जीव घेतेय अन् सरकार श्रीमंतांना कर्जमाफी देतेय, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
राज्यात गेल्या तीन महिन्यात 700 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. याचाच उल्लेख करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर आसूड ओढला. राहुल गांधी यांनी या संदर्भात गुरुवारी एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
विचार करा, फक्त तीन महिन्यात 767 शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले. हे फक्त आकडे नाहीत, तर 767 शेतकऱ्यांची उद्ध्वस्त घरे आहेत. ही अशी कुटुंबे आहेत, जी पुन्हा कधीही सावरू शकणार नाहीत. सरकार मौन आहे. ते फक्त हताशपणे पाहत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
शेतकरी रोज कर्जात खोलवर बुडत चालला आहे. बी-बियाणे महाग आहेत, खते महाग आहेत, डिझेल महाग आहे. पण एमएसपीची कोणतीही गॅरंटी नाही. जेव्हा शेतकरी कर्जमाफाची मागणी करतो, तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण ज्यांच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत त्यांचे कर्ज मात्र आरामात माफ केले जाते. आजचीच बातमी बघा, असे म्हणत राहुल गांधी यांनी अनिल अंबानी यांच्या 48 हजार कोटींच्या एसबीआय फसवणुकीचा उल्लेख केला आहे.
मोदीजी म्हणाले होते की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार. पण आजची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांचे उत्पन्न तर दुप्पट झाले नाही उलट त्यांचे आयुष्य अर्धे होत चालले आहे. ही सिस्टिम शेतकऱ्यांना मारत आहे. आणि मोदीजी आपल्या पीआरचा तमाशा पाहण्यात व्यस्त आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List