‘पंचायत’ फेम अभिनेत्याला 34 व्या वर्षी हार्ट अटॅक, तरुणांमधील हृदयविकाराचं प्रमाण का वाढलंय?
‘पंचायत’, ‘पाताल लोक’ आणि ‘मिर्झापूर’ यांसारख्या वेब सीरिजमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या अभिनेता आसिफ खानला सोमवारी हृदयविकाराचा झटका आला. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी त्याला हृदयाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागलं. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो हळूहळू बरा होत आहे. परंतु कमी वयात येणारा हृदयविकाराचा झटका, हा अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. यामागची कारणं काय असू शकतात आणि हृदयरोग कसा टाळू शकतो, याविषयी अनेक प्रश्न विचारले जात आहेत. “वयाच्या तिशीत हार्ट अटॅक येणं ही बाब आता काही अपवादात्मक राहिली नाही. खरंतर याला जीवनशैली आणि ताण कारणीभूत आहे, ज्यामुळे तरुण वयात हृदयरोग वाढत आहे”, असं नवी दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूटच्या इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीचे प्रमुख संचालक डॉ. निशिथ चंद्रा म्हणाले.
यामागची कारणं काय असू शकतात?
जिममधील व्यायाम असो किंवा डेडलाइन पूर्ण करण्यासाठी वाढवलेले कामाचे तास असो.. अनेकदा तरुण वर्गाकडून त्यांच्या शरीरावर खूप ताण आणला जातो. तणाव आणि पुरेशा झोपेचा अभाव यामुळे शरीराला पुरेसा आराम मिळत नाही. त्यातही सततच्या तणावामुळे कॉर्टिसोल आणि ॲड्रेनलाइन यांसारखे स्ट्रेस हार्मोन्सची पातळी वाढते. यामुळे उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स यांसारख्या समस्या उद्भवतात, असं डॉक्टर चंद्रा यांनी स्पष्ट केलं.
“कधीकधी आपण कामात व्यस्त असताना बराच वेळ पुरेसं पाणी पित नाही. डिहायड्रेशन हेसुद्धा महत्त्वाचं कारण आहे. कारण शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यास रक्त घट्ट होतं. रक्त पंप करण्यासाठी हृदयाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचप्रमाणे इलेक्ट्रोलाइट्स असंतुलित झाल्याने हृदयाचं विद्युत सिग्नल अनियमित होऊ शकतं. यामुळे arrhythmias किंवा कार्डिअॅक अरेस्टसुद्धा होऊ शकतो. रक्त घट्ट झाल्यामुळे धमन्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार होऊ शकतात”, असंही ते म्हणाले. डॉ. चंद्रा यांनी धुम्रपान हेसुद्धा हृदयविकारामागील मोठं कारण असल्याचं सांगितलं आहे.
कमी वयातील हृदयरोग टाळण्यासाठी काय करावं?
“वयाच्या तिशीत आल्यानंतर प्रत्येकाने दर वर्षी शरीराचं पूर्ण चेक-अप करायला हवं. ECG (electrocardiogram), ट्रेडमिल, इकोकार्डिओग्राम, ब्लड कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर यांची वार्षिक चाचणी केली पाहिजे. शुगरचं प्रमाण मर्यादित ठेवा, धुम्रपान सोडून द्या आणि त्याचसोबत संतुलित आहार, व्यायामावर भर द्या,” असा सल्ला डॉक्टर चंद्रा यांनी दिला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List