ईपीएफओने दिली खूशखबर; घर खरेदीसाठी पीएफची 90 टक्के रक्कम काढता येणार
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओने पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. याचा पगारदारांना मोठय़ा प्रमाणात फायदा होऊ शकेल. स्वतःचे घर घ्यायचे ज्यांचे स्वप्न आहे, त्यांच्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. नव्या नियमांनुसार, कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यातून 90 टक्के इतकी रक्कम काढू शकतात.
काय आहे नवा नियम?
नवीन नियमांनुसार कर्मचारी आता त्यांचे पहिले घर खरेदी करण्यासाठी, घर बांधण्यासाठी किंवा गृहकर्जाचा ईएमआय भरण्यासाठी ईपीएफओ सदस्य आपल्या खात्यातून 90 टक्के रक्कम काढू शकतील. यासाठी आधी पाच वर्षांपर्यंतची सेवा आवश्यक होती. मात्र आता तीन वर्षांच्या सेवेनंतर हा लाभ घेता येईल. या सुविधेचा लाभ केवळ एकदाच घेता येईल. हा बदल ईपीएफ योजनेच्या 1952 च्या परिच्छेद 68- बीडीअंतर्गत केलेला आहे. पीएफची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापली जाते. कर्मचाऱ्याचे मूळ वेतन आणि महागाई भत्त्याचा 12 टक्के जमा केला जातो. तेवढाच पैसा कंपनी जमा करते. सध्या ईपीएफवर प्रति वर्ष 8.25 टक्के व्याज आहे.
अन्य बदल कोणते
पीएफची रक्कम ऑनलाईन क्लेम करण्यासाठी आता बँक चेक किंवा पासबुकची सत्यापित कॉपी अपलोड करण्याची गरज नाही.
बँक खात्याची सत्यता आधार ओटीपीवर होईल. यामध्ये कंपनीचा सहभाग नसेल.
जर पुणी सदस्य बँक खाते बदलू इच्छित असेल, तर नवीन खाते नंबर आणि आयएफएससी कोड टापून ओटीपीच्या आधारे प्रक्रिया करता येईल.
ऑटो सेटलमेंट मर्यादा वाढली
याआधी ऑटो सेटलमेंट लिमिट म्हणजे 72 तासांत पीएफ क्लेमची मर्यादा एक लाख रुपये एवढी ठेवली होती, ती आता 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. या नव्या निर्णयामुळे गरजवंतांना पीएफची रक्कम लवकर मिळेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List