इस्रायलचा सीरियावर ड्रोन हल्ला, दमिश्कमधील संरक्षण मंत्रालय केलं उद्ध्वस्त
इस्रायलने सलग तिसऱ्या दिवशी सीरियावर हल्ला चढवला आहे. बुधवारी इस्रायलच्या ड्रोन हल्ल्याने सीरियाची राजधानी दमिश्कमधील संरक्षण मंत्रालयाला लक्ष्य केले. या हल्ल्यात मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराचे मोठे नुकसान झाले आहे. हल्ल्याच्या भीतीने मंत्रालयातील अधिकारी तळघरात लपून बसले होते.
सीरियाच्या दक्षिणेकडील स्वैदा प्रांतात ड्रूझ समुदाय आणि बेदोइन जमातींमध्ये रविवारपासून तीव्र संघर्ष सुरू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत किमान 200 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सीरियन सरकारने या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी आपले सैन्य स्वैदामध्ये (सीरियाचे दक्षिणेकडील शहर) तैनात केले. मात्र या सैन्याने ड्रूझ समुदायाच्या स्थानिक लढवय्यांशी संघर्ष केला, ज्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली. यानंतर इस्रायलने ड्रूझ समुदायाच्या संरक्षणासाठी आणि दक्षिण सीरियातील क्षेत्राला सैन्यविरहित ठेवण्यासाठी हस्तक्षेप केला.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले की, हा हल्ला ड्रूझ समुदायाला संरक्षण देण्यासाठी आणि सीरियाच्या सैन्याला दक्षिणेकडे येण्यापासून रोखण्यासाठी आहे. इस्रायलमधील ड्रूझ समुदायाशी असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळे आणि सीरियातील ड्रूझ समुदायाशी त्यांच्या कौटुंबिक आणि ऐतिहासिक नात्यांमुळे इस्रायलने ही कारवाई केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, सीरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे अनेक सैनिक आणि नागरिकांचा मृत्यू झाला असून, देशाच्या स्थैर्याला धोका निर्माण झाल्याचा आरोप सीरियाने केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List