IND Vs ENG 3rd Test – …तर सामना जिंकलो असतो, टीम इंडियाच्या पराभवानंतर सौरव गांगुली फलंदाजांवर नाराज
लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने दिलेल्या माफक अशा 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचे फलंदाज पत्त्यांसारखे कोसळले. हातातला विजय निसटल्याने सर्वच नाराज झाले. टीम इंडियाच्या या पराभवामुळे टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली निराश झाला असून त्याने टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला यासाठी दोषी ठरवलं आहे.
ऐतिहासिक लॉर्ड्सवर झालेला टीम इंडियाचा पराभव सर्वांच्याच जिव्हारी लागला आहे. सौरव गांगुलीने सुद्धा ‘इंडियन रेसिंग लीग आणि F4 इंडिया चॅम्पियशीप कार्यक्रमा’ दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असताना नाराजी व्यक्त केली. लॉर्ड्सवर झालेल्या पराभवासंदर्भात त्याला प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तो म्हणाला की, “मी या पराभवामुळे निराश झालो आहे. फलंदाजी करण्याच्या पद्धतीवर मी निराश आहे. या आव्हानाचा पाठलाग केला पाहिजे होता. रवींद्र जडेजाने संघर्ष केला. मला वाटते की टीम इंडियाकडे जी प्रतिभा आहे त्यामुळे ते माझ्यापेक्षा जास्त निराश झाले असतील. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडी घेण्याची ही एक चांगली संधी होती. विशेषत: टीम इंडियाच्या फलंदाजीची गुणवत्ता लक्षात घेता 190 धावांपर्यंत पोहोचू न शकल्याने ते निराश झाले असतील. टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी थोडाजरी संघर्ष केला असता तर, हा सामना टीम इंडियाने जिंकला असता.” असं सौरव गांगुली म्हणाला आहे.
जाडेजाने फटकेबाजी करायला हवी होती, माजी कर्णधार अनिल कुंबळेचे मत
या सामन्यात रवींद्र जडेजाने (61) एकाकी कडवी झुंज देत शेवटपर्यंत खिंड लढवली. मोहम्मद सिराजची विकेट गेली नसती तर, नक्कीच सामन्याचा निकाल टीम इंडियाच्या बाजूने लागला असता. रवींद्र जडेजाच्या भविष्या विषयी यावेळी सौरव गांगुलीला विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला की, “रवींद्र जडेजा एक असाधरण खेळाडू आहे. तो फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीत महत्त्वाचे योगदान देतो. त्याने सुमारे 80 कसोटी आणि 200 हून अधिक एकदिवसीय सामने खेळले आहेत. जडेजा हा संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. तो भविष्यातही खेळत राहील.” असं म्हणत सौरव गांगुलीने रवींद्र जडेजाच कौतुक केलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List