‘मुळा’च्या आवर्तनाने 32 हजार हेक्टरला संजीवनी, लाभक्षेत्रातून पाऊस गायब
मान्सून सुरू असतानाही पावसाने हुलकावणी दिल्याने नैराश्यात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी मुळा धरणाचे आवर्तन संकटमोचक ठरल्याचे दिसून आले आहे. तांत्रिकदृष्ट्या भरलेल्या मुळा धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू असतानाच शेतकऱ्यांसाठी डावा व उजव्या कालव्याचेही आवर्तन सोडले गेल्याने राहुरी परिसरातील 32 हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांना संजीवनी मिळाली आहे.
मुळा धरणाचा पाणीसाठा 18 हजार 200 दलघफू होताच धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडत पाणी सोडले गेले होते. परंतु, गेल्या तीन ते चार दिवसांपासून लाभक्षेत्राप्रमाणेच पाणलोट क्षेत्रावरही पावसाने दडी मारली. परिणामी मुळा धरणाकडे होणारी नवीन पाण्याची आवक अत्यल्प होत आहे. मुळा धरणाकडे केवळ 1393 क्युसेक प्रवाहाने नवीन पाण्याची आवक होत होती. त्यापैकी धरणाच्या दरवाजातून 1 हजार क्युसेक प्रवाहाने जायकवाडीच्या दिशेने मुळा नदीपात्राचा प्रवाह वाहत आहे. तर मुळा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याद्वारे शेती सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी डावा कालवा 15 क्युसेक प्रवाह तर उजवा कालवा 400 क्युसेक प्रवाहाने वाहत आहे. दोन्ही कालवे वाहते झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना आवर्तनाचे टॉनिक लाभदायी ठरणार आहे.
डाव्या कालव्याच्या आवर्तनातून राहुरी तालुक्यातील शेती क्षेत्र, तर उजव्या कालव्यावर राहुरीसह नेवासा, शेवगाव, पाथर्डी परिसरातील शेती क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे. मुळा धरणाचा पाणीसाठा सद्यःस्थितीला 18 हजार 226 दलघफू इतका स्थिर ठेवण्यात आला आहे.
शासनाच्या जलाशय परिचलन सूची अनुसार 15 जुलै ते 31 जुलै या कालावधीत धरण साठा 21 हजार 809 दलघफू इतका स्थिर राखला जाणार आहे. त्यामुळे लवकरच मुळा धरणाचे दरवाजे बंद केले जाणार असल्याची शक्यता आहे.
मागणीनुसार आवर्तन देण्यासाठी तत्परता
मुळा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून आवर्तन प्रारंभ झालेला आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षेनुसार दोन्ही कालव्यातून आवर्तन देण्यासाठी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विलास पाटील, शाखाअभियंता राजेंद्र पारखे यांच्याकडून धरण व कालवास्थळी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मुळा पाटबंधारेकडून आवर्तन लाभ दिले जाईल, अशी अपेक्षा आहे.
राहुरीत 100 टक्के पेरणी पूर्ण
राहुरी परिसरात खरिपाची 100 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी कपाशी 18 हजार 400 हेक्टर क्षेत्रावर पेरणी केलेली आहे. बाजरी 3 हजार हेक्टर, सोयाबीन 4 हजार 800 हेक्टर क्षेत्र, मका 6 हजार हेक्टर क्षेत्र, तूर 450 हेक्टर क्षेत्र, मूग व उडिद 90 हेक्टर तर भुईमूग 150 हेक्टर क्षेत्र अशी पेरणी झाली आहे. राहुरी परिसरात एकूण 32 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाल्याने 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. पेरणी 100 टक्के होऊनही पावसाने दिलेली हुलकावणी शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. खरीपाला पाण्याची नितांत गरज असताना मुळा धरणाने संकटमोचक म्हणून मदतीचा हात दिला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List