मराठीला शिव्या देणारा मोकाट; जाब विचारणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे
मराठी भाषा तसेच महाराष्ट्राला शिव्याशाप देणारा विरारमधील रिक्षाचालक राजू पटवा हा मोकाट असून त्यालाजाब विचारणाऱ्या शिवसैनिकांवर मात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या मनमानीचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. गुन्हे दाखल करण्याची कारवाई म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचा प्रकार असल्याचा आरोप मराठी भाषिकांनी केला आहे.
गेल्या आठवड्यात विरारमधील रिक्षाचालक राजू पटवा याने एका महिलेशी असभ्य वर्तन करीत तिच्या भावालाही मारहाण केली होती. यावेळी पटवा याने आपण कोणत्याही परिस्थितीत मराठीत बोलणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा अशी मग्रुरी केली. त्याची चित्रफीतदेखील समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. या मुजोर रिक्षाचालकाचा शोध शिवसैनिकांनी घेतला. एवढेच नव्हे तर शिवसेना स्टाईलने त्याला जाबदेखील विचारला.
शिवसैनिकांनी जाब विचारताच रिक्षाचालक राजू पटवा याने माफी मागितली. यापुढे अशा प्रकारची दादागिरी कदापिही सहन केली जाणार नाही, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख उदय जाधव यांनी दिला होता. मनसेच्या कार्यकर्त्यांनीदेखील पटवा याला धारेवर धरले.
यांच्यावर केली कारवाई
गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख उदय जाधव, महिला आघाडीच्या साक्षी जाधव, उपशहर संघटक रोशनी जाधव, सहसमन्वयक प्रसाद मिरजेकर, शाखाप्रमुख वैभव रुमडे, शाखाप्रमुख दत्ताराम गुरव, उपशहरप्रमुख जितेंद्र खाडे यांचा समावेश आहे. तर मनसेचे शहर सचिव जय जैतापकर व भानुषे यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List