अमेरिकेत टूरसाठी गेलेल्या हिंदुस्थानी महिलेवर चोरीचा आरोप, पोलिसांनी घेतले ताब्यात
अमेरिकेत फिरण्यासाठी गेलेल्या एका हिंदुस्थानी महिलेचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ही हिंदुस्थानी महिला ‘टार्गेट स्टोअर’ या मोठ्या दुकानात सुमारे सात तास फिरत होती. यानंतर या महिलेने संधीचा फायदा घेत भरपूर सामान खरेदी केले आणि त्याचे पैसे न देता घेऊन दुकानाबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. यामुळे अमेरिकन पोलिसांनी तिला चोरीच्या आरोपाखाली बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अमेरिकेतील इलिनॉय येथील एका टार्गेट स्टोअरमधील आहे. येथे एक हिंदुस्थानी महिला सुमारे सात तास या दुकानात निव्वळ टाइमपास करत होती. यातील काही वेळ तिने मोबाईल बघण्यात घालवला तर, काही वेळ फक्त दुकान फिरण्यात व्यस्त होती. तसेच अधे मधे ती बाहेरही येत जात होती. तिच्या अश्या वागण्याने दुकान मालकाला आणि तिथल्या स्टाफला तिचा संशय आला. त्यामुळे त्यांनी लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांना माहिती मिळतात तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस तेथे आले तेव्हा ती महिला एका मोठ्या गाडीत भरपूर सामान भरून पळण्याचा प्रयत्न करत होती. आश्चर्य म्हणजे या सामानाचे तिने पैसेही दिलेले नव्हते. महिला सामानासह पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी तिला पकडले. दुकानातील एका कर्मचाऱ्याने पोलिसांना सांगितले की, “आम्ही सकाळपासून या महिलेला पाहतोय ती सामान उचलून घेऊन जात होती पण त्याचे पैसे देत नव्हती. त्यामुळे आम्ही पोलिसांना याबाबत कळवलं, असे त्याने सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी महिलेची चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा त्या महिलेने पोलिसांची माफी मागितली. “जर असं असेल तर मला माफ करा. मी इथली नाहीये. मी हिंदुस्थानातून आली आहे आणि इथे राहणार नाही. मी या सामानाचे पैसेही देऊ शकते, असे तिने पोलिसांना सांगितले. पण पोलिसांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले आहे, मात्र अद्याप तिला अटक करण्यात आलेली नाही, परंतु तिच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत आणि लवकरच गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List