कल्याण शहर मलेरिया, डेंग्यूचा ‘हॉटस्पॉट’, 30 कंटेनरमध्ये आढळल्या डासांच्या अळ्या
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून डेंग्यूमुळे 31 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने स्वच्छता व डास निर्मूलन उपाययोजनांची पाहणी सुरू केली. यावेळी बांधकाम साईटवरील 30 कंटेनरमध्ये डासांच्या अळ्या आढळल्या. त्यामुळे पालिकेने तीन बांधकाम व्यावसायिकांना प्रत्येकी 25 हजारांचा दंड ठोठावला
साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने डास निर्मूलन मोहीम तीव्र केली आहे. याच पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी ‘अ’ आणि ‘क’ प्रभागात स्वच्छता व डास निर्मूलन उपाययोजनांची पाहणी केली. यावेळी गजानन महाराज मंदिर परिसर, साईबाबा नगर, प्रभाग क्र. 29 मधील गुलमोहर सोसायटी, सद्गुरू कृपा कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, प्रभाग क्र. 28 मधील शकुंतला भवन, खंडेलवाल कॉलनी, क्वालिटी कंपाऊंड व गांवदेवी मंदिर परिसर येथे प्रत्यक्ष पाहणी केली. या तपासणीत सुमारे 200 कंटेनरची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ३० कंटेनरमध्ये मलेरिया आणि डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्या.
बांधकाम साईटवर झाडाझडती
रोकडे कॉलनी आणि पंचमुखी मारुती मंदिर बेतूरकर पाडा परिसरातील एकदंत डेव्हलपर्स, ओम डेव्हलपर्स आणि सर्वोदय कंबाईन या तीन बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणीही डास अळ्या सापडल्या. या बांधकाम व्यावसायिकांना प्रत्येकी 25 हजारांचा दंड ठोठावला. स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी आता पालिका क्षेत्रातील सर्व बांधकाम साईटवर झाडाझडती घेतली जाणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List